Udayanraje Bhosale : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. एकीकडे राज्यातील विविध पक्षाचे नेते राज्यपालांना खडे बोल सुनावत असताना, दुसरीकडे आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा राज्यपालांसह सुधांशू त्रिवेदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (Latest Marathi News)
सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफीनामा लिहून दिला, असे विधान केले. त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे की काय? असे वक्तव्य करताना या लोकांना लाज वाटत नाही का? हे लोक कशाचा आधार घेऊन बोलत आहेत, अशा शब्दांत उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी आपला संताप व्यक्त केला.
'जेव्हा मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते. त्यांना शरण जायचे असते तर तेव्हाच गेले असते. माफीनामा देण्याची गरज नव्हती', असंही उदयनराजेंची स्पष्ट सांगितलं आहे.
उदयनराजेंनी भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची सुद्धा मागणी केली. याबाबतची पुढील भूमिका आपण २८ नोव्हेंबरला स्पष्ट करणार असल्याचं उदयनराजेंनी सांगितलंय. यापुढे शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास नेस्तनाबूत करू, असा इशाराही उदयनराजेंनी यावेळी दिला.
'विकृती ही विकृती असते, त्याला जात, पात, धर्म नसतो. उदयनराजे यांनी राज्यपाल विचार जुना झाल्याचे म्हणत असताना व्यासपीठावर असलेल्यांनी आक्षेप का घेतला नाही? शिवरायांचा अपमान होत असताना गप्प का बसता? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी केला.
भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?
औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. 'आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.