Swasthyam 2022: शरीराच्या आणि मनाच्या सुदृढ आरोग्यासाठी पुण्यात 'स्वास्थ्यम्'; जाणून घ्या सविस्तर...

Swasthyam 2022 Program By Sakal: ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात.
Swasthyam 2022, meditation pranayama By Sakal
Swasthyam 2022, meditation pranayama By SakalSaam TV
Published On

Sakal Swasthyam 2022 News: आरोग्यम् धनसंपदा असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजेच निरोगी आणि सुदृढ आरोग्य हे एखाद्या धनसंपदेप्रमाणे आहे. ज्याला कोणतेही शारीरिक आणि मानसिक विकार नाही तो व्यक्ती आरोग्याच्या दृष्टीने श्रीमंतच आहे, त्यामुळे पैशांच्या श्रीमंतीआधी आरोग्याची श्रीमंती हवी. मात्र, सध्याच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात असं होताना दिसत नाही. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपले शरीर आणि मन खूप थकून जाते. त्यामुळे ताण-तणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रयत्न करूनही ताण-तणाव दूर होत नाहीत. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्यदायी राखण्यासाठी ध्यानधारणा, (Meditation) प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहेत. तसेच, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नागरिकांना शास्त्रीय मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

Swasthyam 2022, meditation pranayama By Sakal
Swasthyam 2022 : सुदृढ आरोग्यासाठी पुण्यात 'स्वास्थ्यम्'; कधी, कुठे अन् कसे व्हाल सहभागी? जाणून घ्या

निरोगी आयुष्यासाठी नागरिकांची गरज ओळखून, 'सकाळ माध्यम समूहा'तील 'वुई आर इन धिस टुगेदर' मोहिमेअंतर्गत ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी 'स्वास्थ्यम्' हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन नागरिकांना लाभणार आहे. (Swasthyam 2022)

२०१७च्या वर्ल्ड डेटानुसार, जगभरातील सुमारे २८ कोटी ४० लाख लोकांना चिंताग्रस्त डिसऑर्डर आहे. ताण-तणाव, चिंता, काळजी, भीती व नैराश्य अशा समस्येचा विविध वयोगटातील विभिन्न लिंगी व सर्व समूहाच्या नागरिकांना सामना करावा लागतो. तसेच, अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या २०२० आकडेवारीनुसार जवळजवळ पाच पैकी एक अमेरिकन प्रौढांचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षीपासून त्यांचे मानसिक आरोग्य असंतुलित झाले आहे.

शरीराच्या विविध भागांत होणाऱ्या व्याधी या लक्षणांवरून सहजच लक्षात येतात. शारीरिक व्याधी किंवा आजाराचे (Health) जसे अनेक प्रकारचे आहेत, त्याचप्रमाणे मानसिक आजार ही अनेक प्रकारचे आहेत. या आजारांच्या लक्षणांमध्ये विविधता दिसून येते. काही लक्षणे बऱ्याच मानसिक रोगांमध्ये सर्वसाधारणपणे एकसारखी आढळतात, ती म्हणजे जास्त वेळ झोपणे, व्यक्तीच्या स्वभावाच्या विरुद्ध वर्तणुकीत व वागणुकीत बदल होणे, मनःस्थितीत बदल जो दीर्घ काळापर्यंत टिकून राहतो आणि सर्वांत महत्त्वाचे असा स्वभावातील बदल त्याच्या दैनंदिन कार्यात दिसून येतो.

मानसिक विकार कोणत्याही वयात होऊ शकतात. तरीसुद्धा काही मानसिक विकार हे विशिष्ट वयातच होताना दिसतात किंवा विशिष्ट वयात त्यांची सुरुवात होताना दिसते. उदा. अतिचंचलता अवस्था या मुलांमध्ये दिसून येतात, स्मृतिभ्रंश हा वयोवृद्धांमध्ये जास्त दिसून येतो. स्किझोफ्रेनियाची सुरुवात सर्वसाधारणपणे तरुण प्रौढावस्थेत होताना दिसते. प्रत्येक पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा मानसिक त्रास होत असतो. त्यातील फक्त दहा टक्के लोकांना उपचार मिळतात. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. त्यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा व योगसाधना महत्त्वाची आहे.

'स्वास्थ्यम्' कशासाठी? ध्यान-धारणेविषयी शास्त्रीय माहिती

मनुष्याला अनेक शारीरिक व्याधी या 'मनाच्या अस्वस्थे'मुळे होतात. ताण-तणाव, मनात सुरू असलेले वेगवेगळे विचार, भीती, काळजी अशा अनेक कारणांनी आपले शरीर व मन थकते. आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी मेंदूची असते, म्हणूनच आपल्या मेंदूचे कार्य अतिशय संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित ध्यानधारणा आवश्यक आहे.

शरीर, इंद्रिये आणि निरोगी मनासाठी प्राणायाम

शरीराच्या विविध अवयवांतील प्राणाचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने शरीरात व्याधी उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राणशक्ती संतुलित होऊन व्याधींचा नाश होतो. नियमित प्राणायामाने शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी ठेवण्यास मदत होते. प्राणायामाच्या माध्यमातून श्‍वास कसा घ्यावा, श्‍वासावर नियंत्रण कसे मिळवावे हे जाणून घेऊ शकता.

उत्तम, निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योगा

मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चार गोष्टींचे संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींना मानवी जीवनाचे योग्य संतुलन राखले जाते.

अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध

अध्यात्मातून माणूस स्वतःकडे पाहण्यास शिकतो, स्वतःकडे पाहिल्याने आत्मपरिक्षणाची सवय लागते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगण्यासाठी, नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यासाठी मदत करते. अध्यात्माचा सकारात्मक प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

सकस आहार आणि आरोग्य

धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक व सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी दुष्परिणाम शरीरावर होतो.

गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध

आपल्या आवडीचे गाणे किंवा संगीत ऐकले, की मन प्रसन्न होते, म्हणजे संगीताचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा आणि गायन - संगीत कलेचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे.

योग : जीवनाचा आधार

योग - प्राणायाम हाच जीवनाचा मूलभूत आधार आहे. ताणतणाव आणि मानसिक विकार यांसारखे आजार कायमचे व समूळ नष्ट करण्यासाठी योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते. त्याचबरोबर रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगसाधना हा योग्य उपाय आहे. सर्वांत जास्त आजार आपल्या आधुनिक व बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. नियमित प्राणायाम व योगसाधना केल्याने आपले जीवन आनंदी आणि सुखी राहते. त्यामुळे विकार होण्याचे प्रमाण कमी होते.

योग हा रोगनिवारक असून, योगाचा संबंध हा आरोग्याशी, शरीरधर्माशी, वैद्यकशास्त्राशी आणि निरोगी जीवनाशी आहे. त्यामुळे योगसाधनेत जास्तीत जास्त आणि प्रत्येकजण गुंतल्यास त्यामध्ये जगाचे कल्याण आहे. आज या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात माणसाला मोकळा श्‍वास घेता येत नाही. शुद्ध हवा व प्राण वायू आपल्या शरीरातील आतल्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी साथीचे रोग, कमी होत गेलेली रोग प्रतिकारशक्ती यामुळे सातत्याने नव-नवीन व्याधी उत्पन्न होत आहेत. अशा परिस्थितीत जितके आयुष्य मिळाले आहे, तेवढे निरोगी आणि स्वच्छ मनाने जगण्यासाठी योग हा माणसाला आधारभूत व दिशादर्शक ठरत आहे. तसेच, श्‍वास हा आपल्या शरीरातील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. योग्य पद्धतीने घेतलेला श्‍वास अनेक आजारांना दूर करतो. योगसाधनेत केलेला प्राणायामाचा सराव आपल्या श्‍वासावर नियंत्रण ठेवतो व आपले शरीर आणि मन संतुलित करतो.

आज माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ताणतणाव, काळजी, भीतीने त्रस्त आहे. अशा परिस्थितीत योग हा मानवाच्या मदतीला धावून येतो. आपण दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला आपले मन चंचल व अशांत होत असते. आपण अनुकूल परिस्थितीत नसतो. आपल्याला वाटते की, आपण या मानसिक अशांततेवर मात करू. पण आपले प्रयत्न असफल ठरतात. अशावेळी योग साधना महत्त्वाची ठरते. आपल्या चंचल मनाला स्थिर व संतुलित करणे हेच योग पद्धतीचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जगताना आपल्याला किती तरी समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत अशांत व चंचल मन शांत केले तर माणसाचे आयुष्य सुखी होईल. बहुतेक सगळे रोग हे मनाशी संबंधित असतात.

म्हणून योगपद्धतीचा अवलंब करून, ध्यान-धारणा आणि प्राणायाम योगसाधनेद्वारे श्‍वास घेऊन, शुद्ध हवा आपल्या संपूर्ण शरिरात पोहोचवण्याचे काम केले जाते. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी योगसाधना महत्त्वाची आहे. तसेच, माणसाला माणूस बनवणे, दैनंदिन जीवनात होणाऱ्या कष्टापासून मुक्ती करून आनंदमयी जीवनाचा आरंभ करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे. ध्यान, योग, एकांत, प्राणायाम यांद्वारे मानसिक समाधान मिळू शकते, माणूस चिंतामुक्त होऊ शकतो. तसेच, अध्यात्मकतेकडे जीवनमूल्यांचा सार व मनःशांतीसाठी अध्यात्म म्हणून पाहिल्यास आपले जीवन सुखी व समाधानी होऊ शकते.

ध्यानधारणेचे फायदे:

ध्यानाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

ध्यानाने आजारांवरील उपचारांना शरीर सकारात्मक प्रतिसाद देते.

नियमित ध्यानधारणेमुळे चिंता, भीती, काळजी दूर होण्यास मदत होते.

प्राणायामाचे फायदे:

१. नियमित प्राणायाम केल्याने शरीर सुदृढ व निरोगी राहते.

२. प्राणायाम केल्याने स्मरणशक्ती वाढते.

३. नियमितपणे प्राणायाम केल्याने शरीराचे सर्व अवयव व पचनसंस्था कार्यक्षम बनतात.

४. आध्यात्मिक शक्ती वाढते, मनःशांती मिळते.

५. मनातील निरर्थक विचार कमी होऊन, मानसिक स्वास्थ्य लाभते.

६. श्‍वसनसंस्था सुदृढ होते.

नियमित योग साधनेचे फायदे:

संपूर्ण आरोग्य: ज्या वेळी आपण संपूर्ण निरोगी असतो, त्या वेळी आपण मानसिकरीत्यादेखील निरोगी असतो. नियमितपणे योगसाधना केल्याने सुदृढ शारीरिक आरोग्य आणि मानसिक समाधान मिळते.

वजनात घट: नियमित योगसाधना केल्याने शरीराचे वजन कमी होते.

ताणतणावांपासून व चिंतेतून मुक्ती: मानसिक चिंता दूर करण्यासाठी योगसाधना उपयोगी ठरते. यासाठी प्राणायाम आणि ध्यानधारणा उपयुक्त ठरते.

आत्मिक समाधान: योगा आणि ध्यानधारणा केल्याने आत्मिक शांती मिळते.

ऊर्जेत वाढ: दिवसभराच्या कामातून शरीर थकते. योगसाधना केल्याने शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते.

शारीरिक तंदुरुस्ती योगसाधना केल्याने शरीर व स्नायू बळकट होतात.

तीन दिवसांत यांचे मिळणार मार्गदर्शन व विषय

३ दिवस अन् या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन

- डॉ. हंसाजी योगेंद्र : योगासाठी सकस आहार आणि योगातून अध्यात्माकडे

- ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : कला आणि संस्कृतीच्या भारतीय प्रेरणा

- अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : आनंदी जीवनाची कला

- योग गुरू श्री एम : योग, अनंत क्षमतेचा मार्ग

- नूपुर पाटील : सकस, जैविक आहार आणि आरोग्य

- प्रियंका पटेल : इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग कार्यशाळा

- अभिनेत्री शिल्पा शेट्टी : कीप इट सिम्पल- योगा आणि फिटनेस

- सर्वेश शशी : योगा, फिटनेस आणि त्यापलीकडे

- अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्सद्वारे शारीरिक तंदुरुस्ती व स्वास्थ्य

- सूफी गायिका रुहानी सिस्टर्स व शास्त्रीय संगीतकार उस्ताद राशीद खान : मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत व गायन

- डॉ. राजेंद्र बर्वे : आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन

- ‘वेड’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख: लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन

‘स्वास्थ्यम्’मध्ये सहभागी व्हा! त्यासाठी काय कराल?

‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून किंवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून रजिस्र्टेशन करू शकता.

Website: https://globalswasthyam.com

- व्यक्तिगत सहभागासाठी : व्यक्तीचे नाव, वयोगट, पत्ता, नोकरी /व्यवसाय व संपर्क क्रमांक

- संस्था व ग्रुपच्या सहभागासाठी : स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्था, ग्रुपचे नाव, कार्य व प्रकल्पाची माहिती, पत्ता व संपर्क क्रमांक

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com