भूषण शिंदे
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरी नंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. अनेक आमदार, खासदारांसह अनेक नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले. मात्र, या परिस्थितीला छेद देत सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते, फुले आंबेडकर विचारांनी प्रेरित अशी सुषमा अंधारे यांची ओळख आहे. सद्याची परिस्थिती पाहता या परिस्थितीला छेद देत सुषमा अंधारे यांचा हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी देशातील लोकशाही वाचवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. (Uddhav Thackeray Latest News)
हे देखील पाहा -
सुषमा अंधारेंच्या हातात शिवबंधन बांधल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, लढाई भरात असताना सैनिक आले आहेत. लढाई सुरू असताना जे सोबत असतात त्यांना महत्व असतं. नीलमताई यासुद्धा कडवट हिंदुत्ववादी नव्हत्या आणि त्या एकदा भेटायला आल्या. हिंदुत्वावर खूप चर्चा झाली आणि मग त्यांनी ठरवलं कि, शिवसेनेत प्रवेश करायचा. फक्त पूजा अर्चा एवढंच हिंदुत्व आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, स्वतःला पुरोगामी म्हणणारे खरंच पुरोगामी आहेत का? लोकशाही वाचवणे गरजेचे आहे. शिवसेनेची कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहेच. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा शिवसेनेच्याच भविष्यासाठी नाही, तर या देशात लोकशाही राहणार का हेदेखील कळणार आहे असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेत टीको केली आहे. ते म्हणाले, नसलेल्या शिवसेनेच्या नेमणुका सुरु आहेत. परंतु आपल्याला आपल्या शिवसेनेची पुर्नबांधणी करायची आहे.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करुन संविधानिक चौकट तोडली जात आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, माझं हिंदुत्व हे शेंडी आणि जाणव्याचे नाही तेव्हा मी ठरवलं कि शिवसेनेत जायचे. माझ्या डोक्यावर कुठल्याही ईडीचं ओझं नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही. मला अजून पीठ-मिठाचे मातोश्रीमधील डबे माहित नाही, मी नवीन आहे. नीलमताई माझ्यासाठी आईप्रमाणे आहेत. अनेक जण म्हणाले कि, मी शिवसेनेवर टीका केली होती. पण, आमचा एकच संविधानिक शत्रू असेल तर मी त्यांचे नेतृत्व करायला तयार आहे असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.