मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल 15 तासांच्या चौकशीनंतर ईडीने रविवारी रात्री राऊतांना ताब्यात घेतलं आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सामनातून काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचंच लक्ष होतं. आजच्या सामना अग्रलेखातून राज्यपालांसह भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. (Sanjay Raut Arrested Latest News)
संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केल्यामुळेच त्यांच्यावर ईडीने ही कारवाई केली असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. 'महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्रात त्या विधानावरून संतापाचा भडका उडाला. तो भडका व रोष कायम असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर 'ईडी'ने रविवारी पहाटे धाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतेच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू केल्या तरी लोकांच्या मनातील भडका विझणार नाही,' असं सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे. (Sanjay Raut News)
'संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानाचा प्रखर शब्दांत शनिवारी समाचार घेतला व रविवारी सकाळी त्यांच्या घरी ‘ईडी’ची पथके पोहोचली. लोक काय ते समजून गेले. भाजप प्रत्येक गोष्ट पैसा, संपत्ती, व्यापारातच तोलतो. त्यामुळे त्यांना रक्त, घाम, अश्रूंचे मोल नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ात भाजप विचारांच्या लोकांचा सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्राच्या लढय़ातही भाजप परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही. मुंबईतील धनिक मंडळ हेच त्यांचे सर्वस्व आहे. बेळगावसह मराठी सीमा भागाविषयी त्यांना आस्था नाही. महाराष्ट्राचे दोन-तीन तुकडे पडले तरी भाजपचे मन अस्वस्थ होणार नाही'. असा आरोपही सामनातून भाजपवर करण्यात आला आहे. (Sanjay Raut TodaysNews)
'राज्यपालांचे विधान श्रीमंत, उद्योगपतींची तळी उचलणारे आहे व शेतकरी-कष्टकऱ्यांचा अपमान करणारे आहे. राज्यपालांनी राजभवनाचे भाजप कार्यालय बनवून ठेवले आहे. अनेक घटनाबाहय़ कृतींचे ते केंद्र बनले आहे. राज्यपाल हे पूर्वाश्रमीचे संघ प्रचारक आहेत. त्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही, पण राजभवनात बसून सरकार पाडणे, काडय़ा घालणे, वादग्रस्त वक्तव्ये करणे हे योग्य नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिगत आयुष्याची खिल्ली उडविणारे राज्यपाल भाजपास प्रिय आहेत'. असा हल्लाबोल देखील सामनातून करण्यात आला आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.