मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांचे निवासस्थान मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर शेकडो शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी मातोश्रीबाहेर मोर्चेबांधणी केली होती. राणा दाम्पत्यांच्या खार येथील निवासस्थानीही शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे युवासेनेचे वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी राणा दाम्पत्याला महाप्रसाद देण्यासाठी मातोश्रीवर येण्याचं आव्हान दिलं होत. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडूनही राणा दाम्पत्याला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नोटीस बजावली होती. या सर्व घडामोडींनंतर राणा दाम्पत्याने अखेर पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) दौऱ्याचं कारण देत आंदोलन मागे घेतले आहे. यावर शिवसेना नेते राणा दाम्पत्यावर टीका करत प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेनेचे मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाहबोल केला आहे. राणा दाम्पत्यांची पळपुटी भूमिका आहे. मोदींच्या दौऱ्यात विघ्न येणार नाही, असं कारण पुढं करत त्यांनी पळ काढला आहे. राण दाम्पत्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यांचं हिंदुत्व हे घंटाधारी आहे. आम्ही गदाधारी आहोत. अशी खरमरीत टीका अनिल परब यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे.
राणा दाम्पत्यावर टीका करताना परब पुढे म्हणाले, राणा दाम्पत्य आव्हानांची भाषा करत मुंबईत आले आणि आता घराबाहेर येत नाहीत. त्यांच्यामुळे मुंबईच्या औद्योगिक नगरीत व्यत्यय आला. शिवसैनिकांनी अजून कायदा हातात घेतला नाही. जो पर्यंत राणा दाम्पत्य माफी मागत नाहीत आणि पोलीस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. अशा शब्दांत परब यांनी राणा दाम्पत्याला सुनावलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचं कारण देत राणा दाम्पत्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. खासदर संजय राऊत यांनी यावर आपल्या शैलित राणा दाम्पत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही घंटाधारी हिंदुत्ववादी, बोगस घंटाधारी मुंबईसह महाराष्ट्रात वातावरण गढूळ करत असल्याचे राऊत म्हणाले. खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वी वाय दर्जाची सुरक्षा दिली आहेत. त्यावरुन संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. खासदार बाईंना सुरक्षा कशी मिळाली हे आम्हाला माहीत आहे, ते मी खासगीत सांगीन असे राऊत म्हणाले.
Edited By -Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.