मुंबई : शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्यासमोरील अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. ईडीच्या विशेष कोर्टाने राऊत यांना ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या ४ ऑगस्टपर्यंत आता ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांना ईडी कोठडी मिळाल्यानंतर आता पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी आपलं मत मांडलं आहे. (Sanjay Raut ED Custody Latest News)
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी राऊत यांना रविवारी अटक करण्यात आली होती. आज त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी ईडीच्या वकिलांनी संजय राऊत यांना ८ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, कोठडी द्यायची असेल तर ८ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी राऊत यांच्या वकिलांनी केली होती. दरम्यान, न्यायालयाने ही मागणी मान्य करत राऊतांना ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आता पुढे काय होणार?
कोर्टाने संजय राऊत यांना 3 दिवसांपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आता पुढे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी आपलं मत मांडलं आहे. 'ईडीने संजय राऊत यांना ३ दिवसांची कोठडी सुनावली, आता ४ ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना परत कोर्टात हजर केलं जाईल. तेव्हा परत जर संजय राऊत यांची चौकशी राहिली असेल, किंवा ईडीला त्यांची पुन्हा चौकशी करायची असेल तर ईडी पुन्हा राऊत यांची कोठडीची मागणी करू शकते' असं मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मांडलं आहे. (Sanjay Raut ED Custody)
'जर संजय राऊतांची चौकशी संपली तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल, तेव्हा ते जामीनासाठी अर्ज करू शकतात. आणि जामीन कोणत्या आधारे द्यायचा याचा विचार न्यायालय करेल', असंही सरोदे यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी ईडीच्या चौकशीला सहकार्य केलं होतं मग ईडी कोठडीची गरज काय असा प्रश्न कायदेतज्ञांना विचारण्यात आला असता, राऊत यांची ईडी कोठडी नेमकी कोणत्या आधारे मागितली हे माहित नाही पण, बेनामी संपत्ती घेतली असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यासाठी त्यांना ही कोठडी देण्यात आली असावी असा अंदाज कायदेतज्ञांनी व्यक्त केला आहे.
ईडी कोठडीत राऊतांना मिळणार या मुभा
दरम्यान, संजय राऊत यांना कोर्टाने ३ दिवसांची ईडी कोठडी सुनावली असली तर, या काळात त्यांना घरचं जेवण, तसेच औषधी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सकाळी साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत त्यांना आपल्या वकिलांशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रात्री साडेदहा वाजेनंतर राऊत राऊत यांची चौकशी होणार नाही. असं देखील कोर्टाने ईडीला सांगितलं आहे.
ईडीला राऊतांच्या घरी काय सापडलं?
दरम्यान रविवारी ईडीने संजय राऊत यांच्या घरी धाड टाकली. यादरम्यान ईडीने तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. मात्र या बंडल वरती एकनाथ शिंदे अयोध्या, असा असे आढळून आल्याने याबाबत ही नेमका सस्पेन्स तयार झाला आहे. तर याबाबत राऊतांनाच विचारा असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दुसरीकडे ईडीने राऊतांच्या घरून काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याची ही माहिती देण्यात आली आहे. तसेच या आधीच राऊतांच्या अनेक मालमत्तांवरती ही जप्ती आणण्यात आली होती. भाजपने देखील याच प्रकरणात संजय राऊतांवरती वारंवार गंभीर आरोप होत होते.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.