मुंबई - समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या बारचा परवाना काही दिवसांपूर्वीच रद्द केला होता. (Sameer Wankhede Latest News)
समीर वानखेडे यांच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
नवी मुंबईतील वाशीमध्ये समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, 1997 मध्ये त्यांनी हा परवाना घेतला तेव्हा त्यांचे 18 वर्षांपेक्षा कमी होते. या बारचे लायसन मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरूनच समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी निशाणा साधला होता.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दावा केला होता की वानखेडे यांच्याकडे नवी मुंबईतील वाशी येथे परमिट रूम आणि बार आहे, ज्याचा परवाना ते अल्पवयीन असताना 1997 मध्ये मिळाला होता आणि हे बेकायदेशीर आहे.
सरकारी नोकरीत असतानाही वानखेडे यांच्याकडे परमिट रूम चालवण्याचा परवाना होता, जो सेवा नियमांच्या विरोधात आहे, असेही मलिक म्हणाले होते. तेव्हा वानखेडे यांनी मंत्र्यांचे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना बार परवान्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द केला.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.