'आमदारकी, मंत्रीपद मिळत नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'

'स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन म्हणजे, तेल गेलं, तुपही गेलं, हातात धुपाटने आलं.'
Raju Shetty
Raju ShettySaam TV

मुंबई: राजू शेट्टी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा म्हणजे, 'आमदारकी, मंत्रीपद मिळत नाही म्हणून उचलेलं पाऊल' असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सदभाऊ खोत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आलो. महात्मा फुले कर्जमाफी योजना ही सरकारने राबवली असून ज्या शेतकऱ्यांनी नियमीत कर्ज भरलं आहे. त्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान द्यायला हवे अशी मागणी आम्ही केली. या मागणीवर फडणवीस यांनी राज्यसरकार शेतकऱ्यांच्या मागे असल्याचं सांगितलं आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारने जर हा निर्णय घेतला असेल तर आम्ही त्याची अंमलबजावणी करू असं आश्वासन देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ -

तसंच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन म्हणजे, तेल गेलं, तुपही गेलं, हातात धुपाटने आलं असं झालं असल्याचा टोलाही त्यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांना लगावला. तसंच अडीच वर्षात त्यांचे सरकार होते तेव्हा हा विषय लावून धरला नाही आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहेत. आमदारकी, मंत्रीपद मिळत नाही म्हणून हे पाऊल उचलेलं असल्याची टीकाही त्यांनी यावेळी शेट्टींवर केली. शिवाय आपले प्रश्न मार्गी लागत नसतील तर तेव्हाच ते सरकारमधून बाहेर का पडले नाहीत? असा सवालही खोत यांनी उपस्थित केला.

शेट्टी यांची भूमिका काय ? -

नियमित कर्ज रक्कम अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थसंकल्पामध्येही याबाबत तरतूद करण्यात आली होती. आता सरकार बदललं तरी प्रोत्साहनपर रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रोत्साहन नव्हे तर खच्चीकरण करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयारावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com