Ramesh Bais : मराठीतून शपथ घेत राज्यपाल रमेश बैस यांनी स्वीकारला पदभार; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकिर्द ?

शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली.
Ramesh Bais
Ramesh Bais Saam Tv
Published On

Ramesh bais News : झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. शनिवारी राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाला राज्यपालांच्या (Governor) पत्नी रामबाई बैस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

कोण आहेत रमेश बैस?

रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश (Madhya Pradesh) व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रमेश बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.

सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

Ramesh Bais
Uddhav Thackeray : दुरी तिरी एक्का.. नीम का पत्ता कडवा है... राज्यात ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक (पाहा व्हिडिओ)

सन १९८९ साली बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

सन २००३ साली श्री रमेश बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

आपल्या प्रदीर्घ सांसदीय जीवनात श्री बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

सन २००९ ते २०१४ या काळात श्री रमेश बैस भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर )व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयका संदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

Ramesh Bais
Uddhav Thackeray : इतिहासाची पुनरावृत्ती! बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंचं मातोश्रीबाहेर जिपमधून भाषण

सन २०१९ साली श्री रमेश बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदग्रहण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com