

Summary -
आयआयटी बॉम्बेच्या नावाबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानावरून राजकीय वातावरण तापलं
राज ठाकरे यांनी हे विधान सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचे म्हटले
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप
मराठी जनतेने जागरूक राहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले
केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक विधानावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. 'मला आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे.', असे विधान जितेंद्र सिंह यांनी केले होते. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी बॉम्बेबाबत केलेल्या विधानाचा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आपली मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची गेल्या अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरूवात केली असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंह यांचा खरपूस समाचार घेतला. हे विधान सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भलीमोठी पोस्ट करत जितेंद्र सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, ' केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बाँबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!'
जितेंद्र सिंह यांनी हे विधान वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी केल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की,'खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून... पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यांपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.'
तसंच, 'आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बाँबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे! तेव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं!', असे आवाहन राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी नागरिकांना केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.