मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार बंड करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आता शिवसेनेला (ShivSena) आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. खासदारांच्या या गटाचे नेतृत्व खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या १२ खासदारांना एकत्रित आणण्यात शेवाळे यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे शेवाळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते, शेवाळे यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विशेष शब्द टाकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावी, ही मागणी पहिल्यांदा राहुल शेवाळे यांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती. त्यानंतर इतर खासदारांनीही एकत्रित आणण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता. तर दिल्लीत या १२ खासदारांची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक घडवून आणण्यात शेवाळे यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे राहुल शेवाळे यांना केंद्रान पद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. राहुल शेवाळे तरुण आणि उच्च शिक्षित खासदार आहेत तसेच त्यांना मुंबई महानगर पालिका कामाचा देखील दांडगा अनुभव आहे. याचमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पालिका निवडणुकीत धोबीपाछाड द्यायचे असेल तर शेवळेंना केंद्रात महत्वाचे स्थान द्यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटते. त्यामुळे एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राहुल शेवाळे यांच्यासाठी विशेष शब्द टाकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.