पुणे : पूर्वीच्या पुणे विद्यापीठाचा 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा नामविस्तार माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट २०१४ मध्ये झाला. या नामविस्तार प्रक्रियेला देखील प्रदीर्घ कालावधी लागला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाची, शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल घेऊन अनेक संस्था-संघटनांच्या मागण्या व आंदोलनांतर हा नामविस्तार २०१४ मध्ये पार पडला खरा; मात्र, अद्याप पर्यंत ज्यांच्या नावाने नामविस्तार झाला त्या सावित्रीबाई फुले यांचा पुतळा त्यांच्याच नावाने असलेल्या विद्यापीठात नव्हता.
विद्यापीठ परिसरात सावित्रीबाईंचा पुतळा बसवण्यात येणार अशी घोषणा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये केली. त्याअनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली व पुतळ्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी (३ जानेवारी) या पुतळ्याचे अनावरण करण्याची घोषणा देखील करण्यात आली. व त्यानुसार अडीच महिन्यांपासून सुरु असलेले पुतळ्याचे काम २७ डिसेंबरलाच पूर्ण झाले होते.
राज्यपालांच्या हस्ते होणार होते अनावरण :
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी रोवली. उद्या सावित्रीबाई यांची जयंती आहे. या शुभमुहूर्तावर राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा उद्या मुंबई दौरा असल्याने राज्यपाल पुण्यात येऊ शकणार नाहीत. राज्यपालांना वेळ मिळत नसल्याने हा अनावरण सोहळा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झाली. मात्र, हा अनावरण सोहळा पुढे ढकलल्यानंतर विद्यार्थी संघटनाकडून तीव्र रोष करण्यात येत आहे.
विद्यार्थी संघटनांकडून रोष व्यक्त :
एका महामानवाच्या जयंती दिनी उच्चपदस्थ असणारी व्यक्ती हजर राहू शकत नसल्याने जर हा अनावरण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असेल तर राज्यपाल हि व्यक्ती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा मोठी आहे का? असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त करण्यात येतोय.
एवढ्या वर्षांपासून विद्यापीठ परिसरात सावित्रीमाईंचा पुतळा नव्हता. महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुतळा विद्यापीठात कुठे बसवण्यात यावा याची पाहणी केली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पुतळ्याचे भूमिपूजन केले. तसेच या पुतळ्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून निधी देखील मंजूर करण्यात आला. उद्या सावित्रीमाई यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार हा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, राज्यपाल यांनी हा कार्यक्रम रद्द केल्याने अनावरणाचा कार्यक्रम पुढे ढकलला जात आहे. राज्यपालांना भाजप कार्यकर्ते, अभिनेते-अभिनेत्र्या यांना भेटायला वेळ आहे. मात्र, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात या देशात केली त्या सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी उपस्थित राहायला वेळ नसेल तर निषेधार्ह बाब आहे. युवासेनेकडून उद्या सावित्रीमाईंच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात येईल.
किरण साळी (युवासेना सह-सचिव)
साविञीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उद्या मुख्य इमारती समोर होणारा पुतळा अनावरण कार्यक्रम राज्यपाल हजर राहू शकत नसल्याने पुढे ढकलण्यात येतोय. मात्र, राज्यपालांच्या अनुउपस्थितीत हा कार्यक्रम होउ शकला नसता का? यापुर्वा विद्यापीठातील पुतळे बसवण्याच्या असा हट्टहास कधी कोणत्या राज्यपालांनी केला नाही. मात्र, ते नाहीत म्हणून उद्या सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी अनावरण सोहळा रद्द केला जात असेल तर फार दुर्दैवी गोष्ट आहे. राज्यपाल येणार नाहीत म्हणून नियोजित कार्यक्रम करणे योग्य आहे का? प्रत्येक गोष्टीत राज्यपाल हस्तक्षेप करणार असतील तर गंभीर बाब आहे.
कुलदीप आंबेकर (स्टुडंट हेल्पिंग हँडस्)
राज्यपाल हे भाजप कार्यकर्ते असल्यासारखे काम करत आहेत. नियोजित कार्यक्रम रद्द करून राज्यपाल दुसऱ्या कार्यक्रमासाठी जाणार असतील, उद्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती असून जर राज्यपालांना वेळ मिळत नसेल तर संतापजनक प्रकार आहे. आम्ही स्वतःहून उद्या या पुतळ्याचे अनावरण करू.
दयानंद शिंदे (प्रदेश संघटक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस)
ज्यांना भारतामध्ये क्रांती म्हणुन ओळखल जाते अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्या १८९ व्या जयंतीच्या निमित्ताने, २०१४ ला नामविस्तार होऊन जवळपास ७ वर्षे झाले तरी आता पर्यंत रखडलेल्या पुतळ्याचे अनावरण महामहीम राज्यपाल महोदय पुन्हा लांबणीवर टाकणार असतील तर आम्ही सुजान पुरोगामी विचाराचे विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधी आता वाट बघणार नाही, आता जे होईल ते आपल्या समोर येईलच, धन्यवाद!
सोमनाथ राजेंद्र लोहार (प्रदेश सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.