Pune News: ताथवडे जमीन प्रकरणात मोठी अपडेट, रामा ग्रुपसह १९ जणांवर गुन्हा; गुंडांच्या टोळ्यांच्या मदतीने बळकावण्याचा डाव

Pune Land Scam: पुण्यातील ताथवडे जमीन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात रामा ग्रुपसह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंडांच्या टोळ्यांच्या मदतीने जमीन बळकावण्याचा डाव असल्याचे समोर आले आहे.
Pune News: ताथवडे जमीन प्रकरणात मोठी अपडेट, रामा ग्रुपसह १९ जणांवर गुन्हा; गुंडांच्या टोळ्यांच्या मदतीने बळकावण्याचा डाव
Pune Land ScamSaam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना त्या भूखंडांवर ताबा मिळवण्यासाठी टोळ्यांचा वापर केला जात असल्याचे पुन्हा एकदा धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ताथवडे येथील ३६ हेक्टर जमिनीच्या वादातून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी कुख्यात रामा ग्रुपचे मोती पंजाबी यांच्यासह १९ जणांवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्ह्याकडे लक्ष घालून, मान्यता दिल्यानंतरच कारवाई सुरू झाली आहे.

पेशव्यांच्या काळातील जमीन, गुंडांच्या तावडीत -

१७६९ मध्ये पेशवे सरकारने नारायण विश्वनाथ भट (थत्ते) यांना ताथवडेतील ३६ हेक्टर ४२ आर जमीन इनाम स्वरुपात दिली होती. मात्र १९५३ मध्ये इनाम अबोलिशन कायद्याने सरकारने ती जमीन ताब्यात घेतली. त्यानंतर न्यायालयीन चढाओढीनंतर थत्ते कुटुंबाच्या नावावर जमिनीचा हक्क आला. पुढे राजीव अरोरा यांनी या जमिनीपैकी तब्बल ३४ हेक्टर ३५ आर जमीन विकत घेतली होती. हा संपूर्ण व्यवहार कायदेशीररित्या पार पडला होता. अरोरा कुटुंबाने आपल्या जमिनीवर सुरक्षा रक्षक नेमून कंपाऊंड उभारले होते. परंतु जमिनीवर लिटीगेशन दाखवून बनावट दावे उभे करण्यात आले. आणि त्याचाच फायदा घेत, रामा ग्रुपच्या पंजाबी भावंडांसह इतरांनी थेट गुंडांच्या टोळ्यांना कामाला लावून ताबा घेण्याचा कट रचला.

रामा ग्रुपचा धाडसी डाव -

फिर्यादी राहुल अरोरा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, मोती उधाराम पंजाबी, राजू राम पंजाबी, जितेंद्र पंजाबी, नरेश पंजाबी यांच्यासह एकूण १९ जणांनी बनावट दस्त, खोटे व्यवहार आणि गुंडांचा वापर करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. या टोळीत किरण थत्ते, उदय थत्ते, महेश गाडगीळ, प्रकाश छाजेड यांच्यासह अभिजित काटे आणि संदिप पवार यांचा समावेश आहे.या साऱ्यांनी बनावटपणे हिस्सा दाखवून एलिफंटा रिअल्टी (रामा ग्रुप) सोबत व्यवहार केला. त्यात काहीच तथ्य नसतानाही खोटे कागद दाखवून जमीन विक्रीचा करार करण्यात आला. त्यावर ताबा मिळवण्यासाठी थेट गुंडांना मैदानात उतरवण्यात आले.

फसवणुकीचा डाव उघडकीस -

१९९५ मध्ये इंदिराबाई थत्ते यांनी अरोरा कुटुंबाने विकत घेतलेल्या जमिनीत दोन-तृतियांश हिस्सा असल्याचा दावा न्यायालयात दाखल केला होता. मात्र ब्रिटिशकालीन कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा दावा फोल ठरला. तरीदेखील हा खटला प्रलंबित ठेवून बनावट तडजोडीचे नाटक रंगवले गेले. दुसरीकडे, रामा ग्रुपला मोठ्या जमिनीची गरज असल्याने त्यांच्यासोबत गुप्त चर्चाही सुरू होती. याचाच फायदा घेत, थत्ते कुटुंबातील काही व्यक्तींनी खोटे कागद तयार करून एलिफंटा रिअल्टीला जमीन विकली आणि ताबा मिळवण्यासाठी गुंडांना काम दिले.

फक्त इतकेच नव्हे तर वर्धमान डेव्हलपर्सचे प्रकाश छाजेड यांच्या सोबतही जमिनीच्या विक्रीचे व्यवहार झाले. सात-बाऱ्यावर नावे कमी झालेली नसतानाही त्याचा गैरफायदा घेऊन दावे दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रियवंदा मराठे, श्रीराम मराठे, सौमित्र मराठे यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलीस आयुक्तांचा थेट हस्तक्षेप -

जमिनीवरील व्यवहार आणि बळकावणीच्या डावाला अधिकृत चौकट मिळवण्यासाठी अनेक प्रभावी व्यक्तींच्या नावांचा वापर झाला. मात्र अखेर सॉफ्टवेअर कंपनी मालक राहुल अरोरा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीला गांभीर्याने घेत आर्थिक गुन्हा शाखा (EOW) यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद पोलिस आयुक्तांच्या थेट मान्यतेनंतरच झाली, हे विशेष मानले जात आहे.

जमिनीवरून वाढलेले गुन्हेगारीकरण -

मावळ व पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने, भूमाफिया व बिल्डर लॉबीने थेट गुंडांच्या सहाय्याने जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. पेशव्यांच्या काळातील ऐतिहासिक जमीनदेखील अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकली आहे. जमीन बळकावण्यासाठी बनावट दस्त, खोटे दावे आणि टोळ्यांची मदत घेऊन केलेली फसवणूक उघड झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पुढील दिशा -

सध्या पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामा ग्रुपसह संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com