ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांकडून (Pune Police) याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. याप्रकरणी दिवसेंदिवस नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात सध्या मोठी अपडेट समोर आली आहे.
ललित पाटीलला पलायन करण्यासाठी मदत करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातल्या रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना याला पोलिसांनी अटक केली आहे. तसंच नाशिकच्या सराफा व्यावसायिकाला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, ललित पाटील पलायनप्रकरणी पुणे पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना याला अटक केली आहे. ललितला ससून रुग्णालयातून पलायन करण्यास मदत केल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केली. अऱ्हाना आणि ललितमध्ये पैशांचा व्यवहार झाला होता. ससून रुग्णालयात दोघांची ओळख झाली होती.
अऱ्हाना हा पुण्यातील एका नामांकित शाळेचा मालक आहे. काही वर्षांपूर्वी त्याने एका बँकेतून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतल्याच्या आरोपावरून त्याला ईडीने अटक केली आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती.
वैद्यकिय उपचारासाठी अऱ्हाना याला ससून रुग्णालयात दाखल केले असता याच ठिकाणी त्याची ओळख ललितसोबत झाली. या ओळखीतून अऱ्हानाने ललितला पळून जाण्यास मदत केली. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी अऱ्हानाचा ताबा घेण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने पोलिसांना येरवडा कारागृहातून अऱ्हानाचा ताबा घेण्याची परवानगी दिली आणि रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.
ससूनमधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये ललित आणि अऱ्हाना यांची ओळख झाली. या ओळखीतून अऱ्हानाने ललितला पळून जाण्यास मदत केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. ललित ससून रुग्णालयामधून पळाल्यानंतर तो काही अंतरावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला. तिथून तो रिक्षाने सोमवार पेठेत गेला.
याठिकाणी दत्ता डोके हा ललितला घेऊन जाण्यासाठी मोटार घेऊन थांबला होता. ही मोटार डोकेच्या नावावर आहे. परंतु तो अऱ्हानाकडे चालक म्हणून कामास आहे. या मोटारीतून ललित रावेतला पोचला. तेथे डोके याने अऱ्हानाच्या सांगण्यावरुन ललितला १० हजार रुपये दिले आणि ते पैसे घेऊन ललित पहिल्यांदा मुंबईला गेला आणि तेथून नाशिकला गेल्यानंतर मैत्रिणीकडून २५ लाख रुपये घेऊन तो पसार झाला.
दरम्यान, याप्रकरणात पुणे पोलिसांनी नाशिकच्या सराफा व्यावसायिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ललित आणि भूषण पाटीलने सराफा व्यावसायिकाकडून सोने, चांदी खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी भूषण पाटीलने दिलेले २५ लाख रुपये सराफा व्यावसायिकाने दिल्याची माहिती आहे. भूषण पाटीलचा साथीदार अभिषेक बलकवडे याच्याकडे सापडलेलं ३ किलो सोने आणि अर्चना निकमकडे सापडलेली ७ किलो चांदी या सराफा व्यावसायिकाकडून विकत घेतल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे.
सराफा व्यावसायिकाकडून तब्बल ८ किलो सोने खरेदी, अभिषेक बलकवडेकडून ३ किलो सोनं जप्त तर उर्वरित ५ किलो सोन्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित सराफा व्यावसायिक ललित पाटीलचा मित्र असल्याची देखील माहिती समोर आली आहे. ललित पाटीलच्या ड्रग्सच्या आर्थिक व्यवहारात सराफा व्यावसायिकाचा संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.