ज्ञानेश्वर हिंगोलीकर
पुणे : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १५ ऑगस्ट रोजी हडपसर, पुणे येथील डॉ. मनिषा सोनावणे यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्बूस सर केले. डॉ. मनिषा यांनी शिखरावर तिरंगा (Flag) फडकावत उणे २५ अशं तापमानात राष्ट्रगीत म्हटले आहे. त्यांनी 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' हा संदेशही दिला आहे. युरोप खंडातील सर्वोच्च शिखर सर केल्यानंतर देशभरातून त्यांचं कौतुक होत आहे.
युरोप (Europe) खंडातील सर्वोच्च शिखर सर करत तिरंगा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत. माऊंट एल्बूस हे शिखर रशियामध्ये असून या शिखराचा उंची 18510 फूट एवढी असून ते संपूर्ण युरोप खंडातील सर्वोच्च शिखर आहे.
सर्वोच्च शिखर सर करण्याची ही मोहीम दि. ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली होती. या मोहिमेदरम्यान दि १५ ऑगस्ट रोजी शिखरावरील वातावरण खूप खराब होते, परंतु भारताच्या स्वातंत्र्यदिनीच शिखर सर करायचे ध्येय असल्याने त्यांनी उणे २५ अंश तापमान व ताशी ५० - ५५ किमी वार्याचा वेग सहन करत मोहीम यशस्वी करून दाखवली. या दरम्यान खराब वातावरणामुळे बाकी सर्व टीमने परत माघार घेतली व फक्त 4 भारतीयांच्या टीमनेच 15 आॅगस्ट ला शिखर सर केले.
सदर मोहिमेत डॉ. मनिषा यांच्या सोबत सांगलीचे अभय मोरे व मुंबई फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत असलेले प्रणित शेळके व योगेश बडगुजर यांनी ही शिखर सर केले. ही मोहिम पूर्ण करण्यासाठी डॉ. मनिषा यांना एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. मनिषा यांनी याआधी सप्टेंबर २०२१ मध्ये आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजरो सर केले आहे. तसेच महाराष्ट्रातील अवघड श्रेणीतील अनेक गडकिल्ले व सुळके सर केले आहेत. तसेच हिमालयामध्ये अनेक ठिकाणी ट्रेकींग केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.