
ज्ञानेश्वर हिंगोलीकर
pune News : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सदर पूल एक व दोन ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सदर पूल पाडण्यासाठी दुपारी ४ वाजल्यापासून १४४ कलम लागू करण्यात येणार आहे, अशी महत्वाची माहिती पुणे (Pune) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
चांदणी चौकातील पूल स्पोटकांद्वारे पाडण्यात येणार आहे. या कामाच्यावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच पूल (Bridge) पाडण्यासाठी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक परिसरात सायंकाळी कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. तसेच ११ वाजण्याच्या आधी सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात येणार आहे.
सर्व बाबी व्यवस्थित असेल तर पूल आधीच स्फोटकाद्वारे पाडण्यात येईल. रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास पूल पाडला जाईल. सकाळी लवकरात लवकर रस्ता सुरू होण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
'चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी दोन्ही रस्त्याची वाहतूक रात्री ८ नंतर थांबवण्याचे काम सुरू होईल. सांयकाळी ६ वाजल्यानंतर परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात होईल. लवकरात लवकर हा पूल पाडून नागरिकांना गैरसोय होणार नाही हा प्रयत्न आहे. सकाळी ८ वाजता वाहतूक सुरू होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती देखील डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
वाहतुकीतील बदल
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे.
• साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंदी राहील.
२०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजता निर्मनुष्य केला जाणार
असा पाडला जाईल जूना पूल
पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले आहे. ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (२ ऑक्टोबर रोजी) पहाटे सर्व तयारी वेळेवर झाल्यास पहाटे १ ते २ च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल.
पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून २०० मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.
पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री
पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले आहेत. नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये आणि पोलीसांनी दिलेल्या वाहतूक विषयक सूचनांचे पालन करावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.