Saamana Editorial: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल 28 मे रोजी नव्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. देशाला नवी संसद मिळाली, मात्र त्यावरून सुरु असलेलं राजकारण सुरूच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये मोदी सरकारवर सडकून टीका करण्याली आहे.
ठाकरे गटाने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या संसदेचं कामकाज 50 दिवसही चालत नाही. मग न चालवल्या जाणाऱ्या संसदेसाठी एक हजार कोटींचा भव्य संसद महाल कशासाठी? असा प्रश्ना सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
नवे संसद भवन म्हणजे फक्त दगड , विटा , रेतीने बांधलेली नक्षीदार इमारत नाही
ऐतिहासिक संसदेला टाळे लावून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मालकीची वास्तू असल्याच्या थाटात नवा भव्य संसद महाल उभा केला. त्या महालात बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्यास लोकशाहीचे मंदिर म्हणू नका . त्या महालात सरकारला धारदार प्रश्न विचारण्याची मुभा नसेल तर ' सत्यमेव जयते ' चा बोर्ड खाली उतरवा . त्या महालात राष्ट्रीय प्रश्नांवर गर्जना करण्यापासून रोखणार असाल तर संसदेच्या घुमटावरील तीन सिंहांचे भारतीय प्रतीक झाकून ठेवा! नवे संसद भवन म्हणजे फक्त दगड , विटा , रेतीने बांधलेली नक्षीदार इमारत नाही. त्या इमारतीत देशाच्या लोकशाहीचे पंचप्राण गुंतले आहेत. आम्ही त्या मंदिरास साष्टांग दंडवत घालीत आहोत! मोदी त्यांच्या स्वभावानुसार वागले. देशाला कर्तव्य पार पाडावे लागेल, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. (New Parliament Inauguration)
संसदेचा उद्घाटन सोहळा म्हणजे सब कुछ मोदी..
नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. हा सोहळा म्हणजे 'सब कुछ मोदी आणि फक्त मोदी' असाच होता. फोटो व इतर चित्रीकरणात दुसऱ्या कुणाची सावलीही मोदी यांनी येऊ दिली नाही. मोदींचा तो स्वभाव आहे. राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले असते, त्यांच्याबरोबर लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती, दोघांच्या मधोमध पंतप्रधान मोदी व त्यांच्या उजव्या बाजूला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे असे चित्र त्या लोकशाहीच्या मंदिरात दिसले असते तर मोदींचे मोठेपण कमी झाले नसते. मोदींनी हे सर्व घडवून आणले असते तर मोदी बदलले असेच जगाला वाटले असते, पण आपला स्वभाव बदलतील ते मोदी कसले? मोदी हे मोदींसारखेच वागतात. (Latest Political News)
मोदींनी आठ वर्षांत त्यांनी संसदेस टाळे ठोकले
मोदींनी आठ वर्षांत त्यांनी त्याच संसदेस टाळे ठोकले व आपल्या मर्जीने संसदेची नवी इमारत उभी केली. एखाद्या महाराजाने आपल्या राजमहालाचा वास्तुप्रवेश करावा तसा त्याच्या उद्घाटनाचा सोहळा केला. लोकशाहीच्या या मंदिरातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अदृश्य होते. मग त्या उद्घाटन सोहळय़ास कोण उपस्थित होते? नव्या संसद भवनाच्या सोहळय़ात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांना फाटा देऊन अंधश्रद्धा, धर्मकांड यांना महत्त्व देणाऱ्यांचा भरणा होता. राजदंडही आता आला. म्हणजे यापुढे एक प्रकारे राजेशाहीची सुरुवात झाली, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
लहरी राजाच्या इच्छेखातर हजार कोटींचा 'महाल'
एक हजार कोटींचा 'महाल' लहरी राजाच्या इच्छेखातर बनवण्यात आला व त्यातून लोकशाहीच हद्दपार झाली अशी नोंद इतिहासात होईल. दिल्लीत मोदींचे राज्य आल्यापासून संसदेचे कामकाज जवळ जवळ बंदच असते. पंडित नेहरूंच्या काळात वर्षाला 140 दिवस किमान लोकसभेचे कामकाज चालत असे. आता ते 50 दिवसही चालत नाही. मग न चालवल्या जाणाऱ्या संसदेसाठी एक हजार कोटींचा भव्य संसद महाल कशासाठी? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सत्ताधाऱ्यांकडूनच संसद बंद पाडली जाते
पंतप्रधान नेहरू जास्तीत जास्त काळ संसदेच्या दोन्ही सभागृहांत उपस्थित राहत, विरोधी पक्षनेत्यांची भाषणे ऐकत. नेहरू प्रश्नोत्तरांच्या तासालाही आवर्जून उपस्थित राहत व सदस्यांच्या अनेक प्रश्नांना स्वतः उत्तरे देत. पंतप्रधान मोदी प्रश्नोत्तरांच्या तासाला कधीच हजर राहिले नाहीत व प्रश्नांना उत्तरे देण्याचा तर प्रश्नच उद्भवला नाही. चर्चेपासून त्यांनी सतत पळ काढला. संसदेत तेव्हा सर्वच विषयांवर चर्चा होत असे व पंतप्रधान चर्चेला उत्तेजन देत असत. आज विरोधकांनी अडचणीच्या विषयावर चर्चा मागितली की, सत्ताधाऱ्यांकडूनच संसद बंद पाडली जाते. विरोधी बाकांवरील सदस्यांना सापत्न वागणूक दिली जाते. हे लोकशाहीचे चित्र नाही, असा घणाघात सामनातून करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.