देहूमध्ये PM मोदी, फडणवीसांचं भाषण; अजित पवारांना डावललं?

देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. मात्र, अजित पवार यांचे भाषण झाले नाही. त्यांना जाणीवपूर्वक डावलले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Ajit Pawar/Narendra Modi/Devendra Fadnavis
Ajit Pawar/Narendra Modi/Devendra FadnavisSaam TV
Published On

पुणे/मुंबई : पुण्यातील देहू नगरीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) भाषण झालं. मात्र, या कार्यक्रमात पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचेही भाषण व्हायला हवे होते. मात्र, त्यांना डावललं गेल्याचा आरोप होत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनाही प्रतिक्रिया दिली आहे. देहूतील कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं मला वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

याबाबत विविध स्तरांतून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बोलू न देणे हे जाणीवपूर्वक घडले आहे, असे दिसते. गेल्या वेळीही अजित पवार यांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणून दिली होती. त्याचाच राग निघालेला यावेळी दिसून येतो, असे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) ट्विटमधून म्हणाले.

'पीएमओकडे परवानगी मागितली होती'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील कार्यक्रमात अजित पवार यांचं भाषण झालं नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही देहूतील कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं मला वाटते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

अजित पवार हे पालकमंत्री आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधान कार्यक्रमाला आले असतील तर त्यांनाही जावं लागतं. अजित पवार यांना या कार्यक्रमात बोलायला दिलं नसेल तर ते अयोग्य आहे, असे मला वाटते. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. नेमके काय प्रोटोकॉल आहेत हे पाहावे लागेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे देखील पाहा -

याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांना जाणीवपूर्वक डावलले असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, असे ते म्हणाले. तर मिटकरी यांचे विधान हास्यास्पद आणि बालिशपणाचे आहे, असे प्रत्युत्तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिले. याबाबत प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल. महाराष्ट्राचा सन्मान, वारकऱ्यांचा सन्मान करण्यासाठीच पंतप्रधान मोदी या ठिकाणी आले होते. राजकारण करण्यासाठी ते आले नव्हते. प्रत्येक वेळी राजकारण करायलाच हवं असं काही नाही. मोदी आल्यानंतर राज्याचा गौरव होतो, असे दरेकर म्हणाले.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com