BMCच्या 'हर घर तिरंगा' अभियानातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे फोटो वगळले; शेवाळे यांनी केली 'ही' मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'हर घर तिरंगा' अभियाना विषयी मुंबईत लावलेल्या होर्डिंग्ज वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावण्यात आले नाहीत.
BMC
BMCSaam TV
Published On

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'हर घर तिरंगा' अभियाना विषयी मुंबईत लावलेल्या होर्डिंग्ज वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावण्यात आले नसून हा राजशिष्टाचाराचा भंग आहे, असा आरोप लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेल्या निवेदनात याविषयी माहिती देऊन राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या पालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे. खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात, शासकीय यंत्रणा, लोकप्रतनिधी आणि शासकीय अधिकारी यांना राजशिष्टाचार पाळणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत राजशिष्टाचाराचा भंग म्हणजे गंभीर बाब असल्याचे नमूद केले आहे.

तर निवेदनात लिहिले आहे की, मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) विविध जनजागृती मोहीमा राबविताना जाहिराती, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज अशा निरनिराळ्या माध्यमांचा उपयोग केला जातो. पालिकेच्या वतीने लावण्यात येणाऱ्या होर्डींग्जवर, राज्याचे प्रथम नागरिक म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे.

मात्र, सध्या माझ्या निदर्शनास आलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या, 'हर घर तिरंगा' या अभियाना विषयीच्या होर्डिंग्जवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र अथवा त्यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. हा केवळ राजशिष्टाचाराचा भंग नसून राज्याच्या सुमारे १३ कोटी जनतेचा अपमान आहे. या अवमनाला पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल हे सर्वस्वी जबाबदार असल्याचा माझे स्पष्ट मत आहे.

BMC
माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा कानमंत्र म्हणाले, 'शिंदे गटाकडे लक्ष देऊ नका आपली लढाई....'

या आधीच्या सरकारच्या कार्यकाळात पालिकेच्या प्रत्येक होर्डिंग वर तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असायचे. मात्र, राज्यातील नव्या शिवसेना-भाजपा सरकारच्या आकसापोटी आणि जुन्या सरकराप्रती असलेली आपली निष्ठा अधोरेखित करण्यासाठीच पालिका आयुक्त अशा हीन पातळीचे राजकारण करत आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत त्यांना कठोर शब्दांत समज देण्यात यावी तसेच कायदेशीर सल्ला घेऊन राजशिष्टाचार भंग करणाऱ्या आयुक्तांवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com