दादा आपण भोळे लोक, शिवसेना, राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं; फडणवीसांचा गंभीर आरोप

'अनेकांना आश्चर्य वाटलं असेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील पण हे अचानक घडलं नाही तर हे ठरवून घडवलं.'
Devendra Fadnavis On Shivsena
Devendra Fadnavis On ShivsenaSaam TV
Published On

सुशांत सावंत -

नवी मुंबई : राज्याचे उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पनवेलमधील भाजपच्या प्रदेश कार्यकरणीची बैठकीत बोलताना महाविकास आघाडीवर सडकून टिका केली. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेला कोणताही शब्द दिला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीचं (NCP) आधीच ठरलं होतं असा गंभीर आरोप देखील त्यांनी शिवसेनेवर यावेळी केला.

फडणवीस म्हणाले, 'आज आपली कार्यकारणी भरगच्च झाली, विविध विषयांवर आपण चर्चा केली आणि मंथन केलं. जसं छत्रपती शिवाजी महाराज गड जिकल्यानंतर थांबत नव्हते, त्याप्रमाणे आपल्याला देखील काम करायचे आहे.

सत्ता हे साध्य नाही तर साधन आहे. हा गड जरी आपण जिंकला असलो तरी मोदींनी जी विकासाची यात्रा सुरू केली आहे ती पुढे न्यायची आहे. मात्र, मागील दोन वर्षात राज्य मागे गेले पण त्याला आपण पुढे घेऊन जायचे आहे.

Devendra Fadnavis On Shivsena
Chandrakant Patil: मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले: चंद्रकांत पाटील

मला अनेक जण विचारतात हे कसं घडले पण हे सरकार यावं ही श्रींची इच्छा, राज्यातील जनतेच्या मनातील संकल्पना होती ती पूर्ण झाली. आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. अघोषित आणीबाणी या राज्यात तयार झाली होती. आपण जो अनाचार, अत्याचार सुरू होतो त्याबाबत आपण लढा देत होतो.

आज राज्यातील जनता खुला श्वास घेत आहे. सरकार आहे पण कोण चालवत हे कळत नव्हतं. राज्याची अधोगती आपण सर्वांनी बघितली. हे सत्तेसाठी परिवर्तन नाही. केंद्र सरकारने जे प्रकल्प सुरू केले ते बंद करण्याचे काम यांनी केली. ही अवस्था दिसत होती त्यावरून वाटायचे की हे कशासाठी सरकार आहे. हे अशा पद्धतीने सरकार चालवत असतील तर यांना शांत बसू द्यायचे नाही. आपल्या अनेकांवर केसेस झाल्यात पण आपण घाबरला नाहीत. राज्यात पहिल्यांदा असे झाले ५० आमदार त्यातले ९ मंत्री आहेत जे सरकार सोडून विरोधात आले.

मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अभिनंदन करीन एक मराठा मर्द मराठा बाहेर पडला, मी त्यांच्या हिमतीचे कौतुक करीन त्यांनी ठरवलं मी बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत असताना तोंड बांधून गप्प बसायचे. जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता तो हे सहन करू शकत नव्हता. राज्याच्या हितासाठीही जे काही केलं ते करणं आवश्यक होतं.

पाहा व्हिडीओ -

शिवसेनेने आमच्याशी गद्दारी केली - फडणवीस

आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं असेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील पण हे अचानक घडलं नाही तर हे ठरवून घडलं. भाजप सत्तापिपासू नाही. आम्हाला मुख्यमंत्री व्हायचा म्हणून सत्ता पाडली नाही. शिवसेनेने आमच्याशी गद्दारी केली. आता जी शिंदे सोबत आहे ती खरी शिवसेना आहे. कुठलाही शब्द त्यावेळी देण्यात आला नव्हता. प्रत्येक सभेत मोदी आणि अमित शहा म्हणायचे की आपल्याला फडणवीस यांच्या नेतृत्वात लढायचे आहे.

चंद्रकांत दादा (Chandrakant Patil) आपण भोळे लोक आहोत कारण त्यांचे आणि राष्ट्रवादीचे आधीच ठरलं होतं. निवडणूक निकाल घोषित होण्याआधी ते म्हणतात आपले सर्व मार्ग सुरू आहेत. मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते पण काही हरकत नाही. चोरून बनवलेले सरकार कधी चालत नाही. जनतेचे सरकार आज निवडून आले आहे. लोकांच्या मनातले सरकार आज आपण तयार केले आहे. आता आपला महाराष्ट्र् वेगाने पुढे जाऊ शकेल असा विश्वास देखील फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com