शरद पवार यांचा निर्णय कुटुंबाला माहित होता. निर्णय कालच जाहीर होणार होता पण वज्रमूठ सभेमुळे आज निर्णय जाहीर झाला असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदावरून पायउतार होण्याची घोषणा करताच बुलडाण्यात सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष नाझेर काजी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
शरद पवारांच्या घोषणेनंतर दिला राजीनामा
निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची केली विनंती
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला राजीनामा
साहेब, पायउतार होण्याचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांना करण्यात येत आहे. मात्र, शरद पवार हे निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही उपोषण सोडा आणि जेवून घ्या, अशी विनंती सुळे यांच्याकडून कार्यकर्त्यांना केली जात आहे.
राज्यातील राजकीय परिस्थिती गंभीर असून यावेळी शरद पवार यांची राज्याला आणि देशाला गरज आहे. त्यामुळे पवार साहेबांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी प्रतिक्रिया अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सदामामा पाटील यांनी दिली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर ही भेट होत असल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
राज्यात राजकारणाची परिस्थिती गंभीर असून यावेळी शरद पवार यांची राज्याला आणि देशाला गरज आहे. त्यामुळे पवार साहेबांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी प्रतिक्रिया अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष सदा मामा पाटील त्यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर दिली.
खासदार आमदार आणि पदाधिकारी यांना शरद पवार यांचा निर्णय मान्य नाही त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय बदलावा नाहीतर आमदार म्हणून आम्ही राजीनामा देऊ. अजित पवार असतील किंवा भारतातील कुठलाही अन्य पदाधिकारी असेल त्यांची जरी अध्यक्ष होण्याची तयारी असली तरी आमच्या दृष्टीने राष्ट्रीय अध्यक्ष हे शरद पवारच आहेत.
वाय बी सेंटरमधून शरद पवार आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले आहेत. यावेळी काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार यांना घरी जाऊ द्या. आम्ही त्यांना कन्विन्स करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही 4 किंवा 5 वाजता सिल्व्हर ओकला परत जातो. तुमच्या मनासारखा मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले.
शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे बोलत असताना अजित पवार यांनी 'सुप्रिया तू बोलू नकोस, असा सल्ला दिला.
थोडा वेळ द्या, शरद पवारांशी बोलून निर्णय घेऊ, असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
पवार साहेबांनी सगळ्यांच्या भावना ऐकल्या आहे. ते अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही असे नाही. पवार साहेबांनी वयाचा विचार करुनच हा निर्णय घेण्यात आलाय. नवीन होणारा अध्यक्ष पवार साहेबांच्या अध्यक्षतेखालीच काम करेल, पवार साहेब निर्णय मागे घेणार नाहीत असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवारांच्या निर्णयाला सर्वांनी नकार दर्शवला असून तुमचा हा निर्णय आम्हाला नामंजूर आहे अशी घोषणा माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची समिती नेमण्याची सूचना केली. या समितीत राज्यातील पक्षाचे नेते व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा समावेश केला आहे. समितीत प्रफुल्ल पटेल, ए.के शर्मा, नरहरी झिरवळ, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय गायकवाड, फौजिया खान, जे.जे.शर्मा यांच्यांसह पक्षाच्या इतर संघटनांमधील पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
आपण गोरगरिबांसाठी, समाजासाठी आधार आयुष्यभर उभा केला, त्याच्यामधून राजकारण न करता सगळ्यांच्या जीवनात आनंद कसा येईल हे पाहिले. शेतकऱ्यांची काळजी घेतली. वेळ अशी आलीय की यावेळी राष्ट्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्षांना एकत्र करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी ही संघटा आहे, ती बळकट होत आहे. त्यामुळे आपण जो निर्णय घेतलाय तो अजिबात कुणालाही मान्य नाही. तो निर्णय मागे घ्यावा अशी विनंती दिलीप वळसे पाटील यांनी केली.
24 वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे," असं शरद पवार म्हणाले. तसंच मी तुमच्यापासून दूर जात नाही, मी फक्त पदावरून निवृत्त होत आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झालं. त्यावेळी पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर काँग्रेस ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. राजकारणात त्यांना मानाचं स्थान राहील. या निर्णयाचा मविआवर काेणताही परिणाम हाेणार नाही असे नमूद केले.
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. तुम्ही थांबणार असाल तर आम्हीही थांबतो अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
अध्यक्षपदाच्या निवृत्तीसंदर्भात समिती जो काही निर्णय घेईल तो शरद पवार यांना मान्य असेल, त्यामुळे तुम्ही आता गोंधळ करू नका असं अवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्याचबरोबर या समितीमध्ये राष्ट्रवादीचेच नेते, सदस्य असणार आहे. त्यामध्ये मी, सुप्रिया सुळे या सुद्धा असतील असं अजित पवार म्हणाले आहेत.
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राजकीय जीवनातून मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमधील सभागृहात कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी त्यांनी शरद पवार, शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले होते. मेहबूब शेख, अंकुश काकडे यांना देखील अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडे यांनी तर शरद पवार यांचे पाय धरुन त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कुठे तरी थांबायचं विचार केला पाहिजे,असे म्हणत शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हणले आहे.