Ajit Pawar News : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवार भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'तुम्ही पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघराचे पालकमंत्री आहात. तुम्ही तुमची पण बदनामी करता आणि आमची पण बदनामी करता, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
अजित पवार सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमातील भर सभेत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अजित पवार म्हणाले, ' चंद्रकांत पाटील यांच्या शाळेसाठी सीएसआरमधून मदत मिळाली. आपण रक्कम दिली तर देणगी दिली बोलतो. लोकवर्गणी दिली म्हणतो. आता त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिका ही योजना काढली'.
'रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका योजना होती. त्या काळात त्यांना काही लोकांनी जमीन दिल्या. तर काही लोकांनी खोल्या बांधून दिल्या. म्हणजे काय त्यांनी भीक मागितली ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागितली का? असा सवाल अजित पवारांनी केला.
'कुठले शब्द कुठे वापरायचे? तुम्ही पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघराचे पालकमंत्री आहात. तुम्ही तुमची पण बदनामी करता आणि आमची पण बदनामी करता. बाकीच्या जिल्ह्यातील लोक बोलतीय यांना काही कळतं का? यांचं बरळणे सुरू आहे, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
'बंधू भगिनींनो तुमच्यात खरी ताकद आहे. कुणाला निवडून पाठवायचं, कुणाला घरी ठेवायचं, कोणाला तुमचा कारभार पाहायला सांगायचा. लोकसभा आणि विधानसभेत पाठवायचं ही जबरदस्त ताकद घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला दिली आहे, असेही अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
"कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. यावेळी सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. तेव्हा त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा सुरु करायच्या आहेत, पैसे द्या. तेव्हाच्या काळात लोकांनी १० रुपये दिले. आता १० कोटी देणारे लोक आहेत" असं वक्तव्य त्यांनी केलं. पैठणमध्ये एका सभेला संबोधीत करताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.