बोटाच्या आकाराएवढी लोखंडी सळई ३० वर्षीय तरुणाच्या पायात शिरली होती. यात तरुणाचा पाय जाण्याची शक्यता होती, मात्र तातडीने केलेल्या उपचारानंतर तरुणाचा पाय वाचण्यास यश आलं आहे. केईएम रुग्णालयातील डॉक्टर व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.
परेल येथे राहणारा संदेश दास (नाव बदललेले आहे) सोमवारी रात्री १० वाजता घरी जाण्यासाठी निघाला होता. वाटेत मित्रांसोबत गप्पा मारत तो १ वाजता घरी पोहचला. मात्र, घराची चावी हरवल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने तो पुन्हा कामगार मैदानाच्या दिशेने गेला. त्यावेळी कामगार मैदानाला आत जाण्यासाठीचे गेट बंद झाले होते. त्यामुळे जाळीवरून उडी मारून जाण्याचा त्याने प्रयत्न केला. दरम्यान, सुरक्षा जाळीला लावलेल्या बाणाचे तीक्ष्ण टोक संदेशच्या पायात घुसले. त्यावेळी संदेशने आरडाओरड सुरू केली. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला बोलावले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सुरुवातीला त्याला तातडीचे उपचार मिळावे यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी पायात घुसलेली सळई लांबून तोडून काढली व संदेशला केईएम रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. स्थानिकांनी त्याला तातडीने केईएममध्ये दाखल केले. मात्र, बोटाच्या आकाराची सळई पूर्णपणे काढणे शक्य नव्हते. त्यामुळे पुन्हा अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून गॅस कटरच्या मदतीने त्यांनी ही सळई काढली. त्यानंतर डॉ. संगीता रावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला उपचार देण्यात आले. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याआधी त्याला उपचार मिळाल्याने पाय वाचला, असे केईएम रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.
शरीराच्या कोणत्याही भागात लोखंडी वस्तू घुसल्यानंतर रक्तवाहिन्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे रुग्णावर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे असते. त्यामुळे आमच्या टीमने तातडीने उपचार दिले. पालिका रुग्णालयात अल्पदरात तातडीचे उपचार मिळत असल्याने रुग्णांना दिलासा मिळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.