आपल्या घरातील सदस्य रूग्णालयात अॅडमिट असला की, घरातील प्रत्येक सदस्य टेन्शनमध्ये असतो. अॅडमिट असलेला व्यक्ती घरी सूखरूप येत नाही तोपर्यंत सगळं घर रूग्ण आणि रूग्णालयाभोवती फिरत असतं. त्यामुळे सदस्यांना अन्न-पाण्याकडेही लक्ष लागत नाही. या धावपळीत सगळ्यांचे जेवणाचे अतोनात हाल होतात.
रूग्णालयात दाखल झालेले प्रत्येक रूग्णाची आर्थिक स्थितीही बरी असते असं नाही. आधीच रूग्णालयातील औषधोपचाराचा खर्च, त्यात काहींना जेवणासाठीही पैसे उरत नाही. त्यामुळे रुग्ण्यासोबत असलेल्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय होते. मुंबईत असे काही एनजीओ आहेत, जे रूग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची गैरसोय होऊ देत नाहीत. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दोन घास देणाऱ्या अन्नदात्यांचा प्रवास
रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची होणारी अडचण मुंबईत राहणाऱ्या भाटकर दाम्पत्यांनी ओळखली. हीच अडचण ओळखून सुरू भाटकर दाम्पत्याने अन्नदानांचा उपक्रम सुरु केला. मात्र आता या उपक्रमाद्वारे शेकडो लोकांना अन्नदान केलं जात आहे. 'दोन घास विथ आर्य'असं या उपक्रमाचं नाव आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भाटकर दाम्पत्य केईएम रूग्णालयाबाहेर सकाळी आणि संध्याकाळी दररोज साधारण ३००हून अधिक लोकांना अन्नदान करतात. अर्थात यामागे त्यांच्याशी संबंधित अत्यंद दु:खद प्रसंग आहे.
दोन घास विथ आर्य
महाराष्ट्रात वास्तव्यास असणारे विक्रांत आणि शीतल भाटकर यांच्यावर २०१० साली दु:खाचा डोंगर कोसळला. यांना असलेला ८ वर्षाचा आर्या गंभीर आजारामुळे जग सोडून गेला. त्याच्या स्मरणार्थ भाटकर दाम्पत्यानी २०१६ पासून 'दोन घास विथ आर्य' हा उपक्रम सुरू केला होता.
आर्य गंभीर आजाराची झुंज देताना भाटकर दाम्पत्याचा बराच वेळ रुग्णालयात जात असे. त्याच काळात त्यांना रूग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांची होणार गैरसोय दिसली. तेव्हापासून भाटकर दाम्पत्यानी या उपक्रमाचा विचार केला आणि ते सत्यात उतरवले. सुरूवातीला ५० रूग्णांसाठी दररोज अन्न बनवलं जात होतं आणि ते मुंबईतील केईएम रूग्णालयात वाटले जात होते. २०१६ साली सुरू केलेले काम २०२३ पर्यंत नियमित सुरु आहे. शीतल भाटकर यांनी त्यांच्या कार्याबाबत साम डिजिटलशी बोलताना सविस्तर माहिती दिली.
२०१६ नंतर रूग्णांच्या नातेवाईकांची संख्या वाढल्यामुळे आता केईएम रूग्णालयात दोन वेळते साधारण ३०० जेवणाचे डबे वितरित केले जातात. जेवणामध्ये सर्वसाधारणपणे नाश्त्यासाठी नियमित ठरवलेल्या पदार्थासोबत चहा तसेच एका वेळच्या पोळ्या, भाजी, वरण ,भात , केळी तर संध्याकाळी पुलाव किंवा दालखिचडी असते.
स्वयंसेवकांचे योगदान
भाटकर दाम्पत्यांना त्यांच्या या कामात अनेकजण मदत करत आहेत. त्यांच्या मदतीला आलेल्या स्वयंसेवकांचे योगदानही मोठे आहे. विशेष म्हणजे या अन्नदानाच्या कामासाठी अनेक खासगी तसेच सरकारी सेवेतील निवृत्त व्यक्ती देखील पुढे आले आहेत.
केईएम रूग्णालयाबाहेर दररोज सकाळी-संध्याकाळी रूग्णांच्या नातेवाईकांच्या जेवण घेण्यासाठी रांगा लागत असतात. रूग्णालयात दाखल केल्यानंतर रूग्णांच्या नातेवाईकांना विशेष असे गेट पास देण्यात येतो, त्यावरून त्यांची ओळख स्वयंसेवकांना होते.
मुंबईबाहेरही अन्नदानाचा उपक्रम
भाटकर दाम्पत्यांच्या उपक्रमाची व्याप्ती मोहीम मुबंईसह अन्य ठिकाणी वाढली आहे. मुंबईव्यतिरिक्त यांचे कळवा, कोल्हापूर ,रत्नागिरी तसेच अमरावती येथील सिव्हिल रूग्णालयामध्येही रूग्णांच्या नातेवाईकांना एका वेळेचे अन्न वितरित करण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच टाटा रूग्णालयाच्या नातेवाईकांसाठी वडाळ्यात नाश्त्याची सोय करण्यात येत आहे. तर शिवडी टीबी रूग्णालयातही या अशाच प्रकारची सेवा 'दोन घास विथ आर्य' या उपक्रमामार्फत देण्यात येते.
अन्य उपक्रम
भाटकर दाम्पत्यांची 'दोन घास विथ आर्य' या उपक्रमासोबतच आश्रय, दवा दान, शौर्य, चाय की चुस्की, ज्ञान हे देखील उपक्रम आहे. या उपक्रमांद्वारे रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणासाठी लागणारे पदार्थ पुरवले जातात, वैद्यकीय मदत, दुर्मिळ आजारांबद्दल लोकांच्यामध्ये जागरूकता वाढवणे, शिक्षण अशा विविध गोष्टींची मदत केली जाते.
२०१६ साली सुरू झालेला आर्य संस्थेचा प्रवास शीतल भाटकर यांच्या पती विक्रांत भाटकर यांच्या पाठिंब्याने विस्तार झाला आहे. अवघ्या दोन ते तीन स्वयंसेवकांपासून सुरु झालेल्या या संस्थ्येत सद्यस्थितीला सुमारे ७० स्वयंसेवक आहेत. भाटकर दाम्पत्याला आपल्या या कार्याची व्याप्ती आणखी वाढवाची आहेत, त्यासाठी अनेक मदतीने हात पुढे आले पाहिजेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.