Mumbai Juhu Chaupati News: मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरातून एक भयानक घटना समोर आली आहे. जुहू चौपाटी परिसरात फिरायला गेलेले ६ लहान मुले समुद्रात बुडाले होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. यापैकी दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं गोचं. मात्र, ४ जण बेपत्ता होते. यातील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. (Latest Marathi News)
अजूनही दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. रेस्क्यू दलाच्या जवानांकडून त्यांचा शोध सुरू आहे. धर्मेश वालजी फौजिया (वय 16 वर्ष) आणि शुभम योगेश भोगानिया (वय 16 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बिपरजॉय चक्रवादळामुळे समुद्राला उधाण आलं आहे. समुद्र किनाऱ्यावर वेगाने वारे वाहत असल्याने मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर कुणीही जाऊ नये, असा इशारा मागील आठवडाभरापासून दिला जात आहे.
अशातच सोमवारी सायंकाळच्या सुमारास वाकोला परिसरातून ६ अल्पवयीन मुलं जुहू चौपाटीवर (Juhu Chaupati) फिरायला आले होते. यातील काहीजण समुद्राच्या पाण्यात उतरले. मोठमोठ्या लाटा उसळत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते बुडू लागले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना इतर लहान मुलेही समुद्रात बुडाली.
हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पाण्यात उतरून या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ४ मुलं दिसेनाशी झाली. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
समुद्रात बुडालेल्या ४ मुलांचा शोध घेण्यात आला. यातील दोन मुलांचे मृतदेह हाती लागले असून अजूनही दोघे बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून चक्रीवादळामुळे समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याने कुणीही पाण्यात उतरण्याचं धाडस करू नका, असे आव्हान प्रशासनाने केले आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.