मुंबईसह राज्यभरामध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं पुन्हा ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभरासाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी चार धरणं आज पुन्हा ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमधून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९५.२७ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहचेल.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे मुंबईसह इतर शहरांना पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील मध्य वैतरणा, मोडकसागर आणि तानसा धरण तिसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मोडकसागर धरणातून १४९७८ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मध्य वैतरणा धरणातून ८१२२ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तानसा धरणातून १४३६८ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मुंबई महानगर पालिकेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९५ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,७८,८७७ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९५.२७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १२,३९,५४१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८५.६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला आहे.
मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.
- अप्पर वैतरणा - ९३.४२ टक्के पाणीसाठा
- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.
- तानसा - ९८.३७ टक्के पाणीसाठा.
- मध्य वैतरणा - ९७.२४ टक्के पाणीसाठा
- भातसा - ९३.६१ टक्के पाणीसाठा.
- विहार - १०० टक्के पाणीसाठा.
- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.