Mumbai Crime News : मुंबईच्या दिंडोशी परिसरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिला म्हणून २४ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने चाकू हल्ला केला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरूवारी (२९ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)
प्रमिशा उंडारे (वय २४) असे जखमी तरुणीचे नाव आहे. प्रमिशा हिच्यावर मुंबईतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा (Crime News) दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.
राजेंद्र परब असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व आरोपी एकाच परिसरात राहतात. दोघांमध्ये पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीत दुरावा आला.
प्रमिशा आपल्यासोबत बोलत नसल्याने राजेंद्र याला राग अनावर झाला होता. तो प्रमिशाकडे वारंवार बोलण्याची तसेच लग्नाची मागणी घालत होता. मात्र, प्रमिशा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. दरम्यान, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास प्रमिशा ही बोरिवली येथून कामावरून घरी परतत होती.
दुर्गावाडी चाळ, देवीपाडा नॅशनल पार्कजवळ प्रमिशा आली असता, आरोपी राजेंद्र याने तिची वाट अडवली. त्यावेळी आरोपी राजेद्र परब याने तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. प्रमिशाने त्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्या गळ्यावर व हातावर चाकूने वार केले.
या घटनेत प्रमिशा गंभीरित्या जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमिशाने दिलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी आरोपी राजेंद्र विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.