MIM भाजपची बी टीम, तर मनसे सी टीम : आदित्य ठाकरेंनी डागली तोफ

जनतेला दिलेली वचने पूर्ण करणे हेही हिंदुत्वच - आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray SaamTvNews

पुणे : साम टिव्हीचा (SaamTV) 'लिडींग आयकॅान्स ॲाफ महाराष्ट्र' हा पुरस्कार सोहळा आज पुण्यात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी (Prasanna Joshi) यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत प्रसन्न जोशी यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उभय नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली. (Leading Icons Of Maharashtra)

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना प्रसन्न जोशी यांनी शिवसेनेच्या सामना मुखपत्राच्या 'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक' या टॅगलाईनचा दाखल देत, मनसे (MNS) आणि भाजप (BJP) हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात शिवसेनेच्या हिंदुत्ववादी राजकारणाची जागा व्यापण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत तसेच गुढीपाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत, अजान विरुद्ध हनुमान चालीसा अशी प्रखर हिंदुत्वावादी भूमिका घेतली आहे. याला शिवसेना (Shivsena) कसे तोंड देणार असा प्रश्न विचारला.

यावर उत्तर देताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आमचं हिंदुत्व हे जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्याचे आणि लोकांची सेवा करण्याचे हिंदुत्व आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मी आधी टाईमपास टोळी संबोधायचो कारण त्यांचं राजकारण हे टाईमपास राजकारण आहे. सध्या मनसेला भाजपची 'सी टीम' म्हणून काम मिळाले आहे, याचा आपल्याला आनंद होत असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) आणि मनसेला नाव न घेता लगावला. तसेच भाजपची 'बी टीम' एमआयएम (MIM) असून मनसेने 'सी टीम' म्हणून काम सुरु केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपच्या राजकीय रणनीतीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपला राजकारण करायचे असते, सत्ता हस्तगत करायची असते तिथे तिथे काही भाजपकडून पक्षांना वापरण्यात येते. एकमेकांच्या विरोधात काहीतरी प्रक्षोभक बोलून, हिंदू-मुस्लिम दंगे लावून, वादविवाद घडवून सत्ता काबीज करणे यावर भाजपचा भर असतो. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील कालचे भाषण हे त्याचाच एक भाग असल्याचे आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता म्हटले.

जो पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्याकडे लक्ष्य देण्याची गरज नसल्याचा टोलाही आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला. आपल्या राज्यामध्ये कोणाच्या तरी बोलण्यावरून वाद-विवाद वाढू नयेत व संवादाने राज्यात शांतता राहावी असे म्हणत हिंदुत्वासाठी सतत लढत राहायची गरज नसून राजकीय पक्षांद्वारे जनतेस देण्यात आलेली वचने जरी पूर्ण कऱण्यात आली तर तेही हिंदुत्वच आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com