हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवनिर्वाचित खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या सूटची मागणी केली होती. कंगना रनौतच्या या अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अशामध्ये कंगना रनौतच्या या मागणीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी करणं हा मूर्खपणा आहे.', असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कंगना रनौतवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, 'खरं म्हणजे त्या इतक्या मोठ्या आहेत त्यांना राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं मोठ्या सूटमध्ये. एक नियम आहे नवीन खासदार जेव्हा निवडून दिल्लीत जातात आम्हीही गेलो तेव्हा ते ज्या राज्यातून निवडून जातात त्या राज्याच्या दिल्लीतल्या त्या वास्तू आहेत, सदन आहेत, बिहार सदन असेल, उत्तर प्रदेश भवन असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र सदन असेल, गुजरात भवन असेल त्यामध्ये त्या खासदाराची व्यवस्था केली जाते. त्या खासदाराला कायमस्वरूपी निवासस्थान मिळेपर्यंत तिथे व्यवस्था केली जाते.'
कंगना रनौतची मागणी म्हणजे मोठा विनोद असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. 'आजही आपल्या राज्याचे खासदार जे निवडून गेले आहेत. मी कालच चौकशी केली आमच्या खासदारांची. ते महाराष्ट्र सदनमध्ये आहेत आणि त्यांना एक सिंगल रूम मिळाली आहे राहण्यासाठी. ते आपली व्यवस्था करतात तिथे. आता या कंगना राणावत नावाच्या ज्या श्रीमती आहेत त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांचा सूट मागावा हा फार मोठा विनोद आहे. त्या हिमाचल प्रदेशमधून निवडून आल्या आहेत. त्यांची व्यवस्था हिमाचल सदनमध्येकायद्यानुसार व्हायला हवी.', असे संजय राऊत यांनी सांगितले.
तसंच, 'हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल की कंगना रनौतला मुख्यमंत्र्यांचा सुट द्यावा तर आमची काही हरकत नाही. मग आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक सीनियर खासदार आहेत, जॉईंट किलर आहेत मग त्यांना द्या मुख्यमंत्र्यांचा सूट. अशा मागण्या करणं हा मूर्खपणा आहे. असू द्या त्या कंगना रनौत आहेत. त्या उद्या पंतप्रधानांना देखील बोलू शकतात की मला पंतप्रधान निवासामध्ये ठेवा, राष्ट्रपती भवनातील स्पेशल सूट द्या. ऐवढी मोठी अभिनेत्री आहे ती. पण आता त्या एक खासदार आहेत. इतर नव्या खासदारांप्रमाणे ती आहे. त्यांना स्पेशल सुविधा नाही मिळू शकत. महाराष्ट्रातून जे निवडून गेले आहेत ते महाराष्ट्र सदनात राहणार. कंगना रनौत या देशाची महान कलाकार आहे. ती हिमाचलमधून निवडून आली आहे तर तिला हिमाचल भवनमध्ये सूट दिला पाहिजे. '
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.