Ajit Pawar
Ajit Pawar Saam tv

Maharashtra Politics Explainer : युती सरकारमध्ये अजित पवारांचं पारडं जड? समजून घ्या राजकीय गणितं

Maharashtra Politics Explainer: राज्याच्या राजकारणात अजित पवारच 'दादा' असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
Published on

Maharashtra Politics Explainer

राज्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा आज अखेर सुटला. राज्याच्या राजकारणात अजित पवारच 'दादा' असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून अजित नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अजितदादांची हीच नाराजी आज दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या गटाला ७ पालकमंत्रिपदे देण्यात आली आहेत, असे मानले जाते. (Latest Marathi News)

अजित पवारांचं दबावतंत्र यशस्वी झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. महायुती सरकारमध्ये अजित पवार यांना झुकतं माप मिळत असल्याचंही यातून स्पष्ट झालं आहे. मात्र अजित पवार यांना एवढं झुकतं माप का मिळत आहे, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणनीती

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार जिंकून आणण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला असला तरी, राज्यात महायुतीची ताकद एवढी वाढली नसल्याचं अनेक सर्व्हेंतून समोर आलं होतं. त्यामुळे अजित पवारांना सोबत घेत भाजपने महाविकास आघाडीसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. म्हणूनच अजित पवारांची नाराजी भाजप आणि शिंदे गटाला सध्यातरी परवडणारी नाही.

शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

शिवसेना (शिंदे गट) आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे सुरू आहे. आमदार अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मात्र शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास 'प्लान बी' राबवण्यासाठी अजित पवार सोबत असणे ही राजकीय गरज आहे.

अजित पवारांकडे प्रशासनाचा अनुभव असलेले वजनदार नेते

राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत पक्षातील अनेक मातब्बर नेतेही आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे अशा बड्या नेत्यांचा प्रशासनावर वचक आहे. तसेच अनेक निवडणुका जिंकण्याचा तगडा अनुभव या नेत्यांकडे आहे. या मोठ्या नेत्यांच्या अनुभवाचा फायदा महायुतीला नक्कीच होऊ शकतो.

मराठा चेहरा

अजित पवार यांचं राज्यातलं राजकीय वजन किती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यात जातीय समीकरणाचा विचार केला तर अजित पवार राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा मराठा चेहरा सध्याच्या घडीला तरी दिसतो आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही जोडी महायुतीची ताकद वाढवते.

महाविकास आघाडीची ताकद झाली कमी

शिवसेना फुटीनंतर भावनिक लाटेचा ठाकरे गटाला फायदा होईल, असा अंदाज होता. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद कमी करण्याचं काम अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून केलं. मात्र महाविकास आघाडीला पुन्हा बळ मिळू नये यासाठी अजित पवारांना सोबत ठेवणे, भाजपची सध्याची गरज आहे. त्यामुळे अजित पवारांची नाराजी भाजपसाठी तोट्याची ठरू शकते.

-------------------------

अजित पवार हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पॉवरफुल नेतृत्व आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि रोखठोक स्वभावामुळे ते नेहमी चर्चेत येतात. विशेषत: मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी भल्या पहाटे भाजपसोबत शपथविधी उरकला त्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा सर्वसामान्य माणसाचा दृष्टीकोन बदलला आहे.

आता अजित पवारांकडे कायम संशयाच्या नजरेने पाहिले जाते. त्यांची प्रत्येक खेळी ही १०० टक्के राजकीय असते आणि त्यातून काहीही करून सत्तेत राहणेच त्यांना पसंत आहे, असा एक समज तयार झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर ज्याप्रकारे अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून सत्तेत वाटा मिळवला त्यावरूनही त्यांना अनेक वादांचा सामना करावा लागलाय.

- राहुल गडपाले, संपादक, सकाळ, मुंबई.

तिन्ही पक्षांचा समन्वयक म्हणून मला तर वाटतं की, अशा प्रकारची कुठलीही धुसफूस नाही. जे लोक याबाबतीत 'पतंग' उडवत आहेत, मला वाटतं त्यामध्ये लक्ष देण्याचं कारण नाही. अजितदादांना पुण्याचं पालकमंत्रिपद दिलं, त्यांच्याकडे पूर्वी देखील पालकमंत्रिपद होतं. चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन -दोन पालकमंत्रिपदे दिली गेली. सोलापूर आणि अमरावतीसारखा अतिशय महत्वाचा जिल्हा त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

- प्रसाद लाड, आमदार, भाजप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com