सचिन गाड, मुंबई
Mumbai News: आयसीसच्या महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणी (Maharashtra ISIS Module Case) अटक करण्यात आलेले दहशतवादी मुंबईत कारवाया करण्याच्या तयारीमध्ये होते पण त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. एनआयएच्या वकिलांनी कोर्टात हा मोठा दावा केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना एटीएसने (ATS) अटक केली आहे. आफिक नाचनला शनिवारी भिवंडीच्या पडघा येथून अटक करण्यात आली होती. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पडघ्यातून अटक करण्यात आलेल्या आफिक नाचन आणि इतर काहींना परदेशी दहशतवादी संघटनांनी प्रशिक्षण दिल्याचा दावा एनआयएने कोर्टात केला आहे. महाराष्ट्रात दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात असलेले हे सर्व दहशतवादी व्हीपीएनचा वापर करत होते. एनआयएने अटक केलेल्या सर्व आरोपींच्या राहण्याची सोय केल्याचा आरोप आफिकवर आहे. तसंच, आयईडी तयार करुन त्याची चाचणी घेण्यात देखील त्याचा सहभाग असल्याचे एनआयएने कोर्टात सांगितले.
तसंच, आफिक नाचन हा इतर आरोपींसोबत घातपाताची तयारी करत असल्याचा संशय आहे. या सर्व आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवादी प्रकरणात (Pune Terrorist Case) आज धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसने मोठी कारवाई करत दहशतवादी कारवायांचा मोठा कट उधळून लावला.
अटक करण्यात आलेले दहशतवादी पुण्याच्या कोंढव्या भागामध्ये राहायचे. त्याच ठिकाणी दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर (Bomb Making Training) आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसच्या (ATS) तपासातून हे उघड झाले असून बॉम्ब तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
एटीएसने घटनास्थळी पुरलेले बॉम्बचे साहित्य जप्त केले आहे. थर्मामीटर, पीपेट, लँब इक्यूपमेंट जप्त करण्यात आले आहे. या बरोबरच बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी पांढरी पावडर सुद्धा एटीएसने घटनास्थळावरुन जप्त केली आहे. ज्याठिकाणी या दोन्ही दहशतवाद्यांनी बॉम्बची चाचणी आणि प्रशिक्षण घेतलं होतं त्या ठिकाणावरुन ही पावडर जप्त करण्यात आली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे चौकशीतून उघड झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.