मुंबई : हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडवणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्याआधी महाविकास आघाडीचा महामोर्चा 17 डिसेंबर रोजी मुंबईत काढण्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फोडण्याचा डाव आखला जात आहे. सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना केली जात आहे. फुटीरतेची बीजं इथं पेरली जात आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांची बैठक पार पडली आहे. या तिन्ही पक्षांनी एकजूट दाखवण्याचं ठरवलं आहे. हिवाळी अधिवेशनाआधी 17 डिसेंबर रोजी मुंबईत अतिभव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.
जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा विराट महामोर्चा निघणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे उद्योग पळवले. आता कर्नाटकची निवडणुकीसाठी महाराष्ट्राची गावं कर्नाटकला जोडणार का? असा सवालही त्यांनी केला.
त्यामुळे आता सर्वांनी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन झालेला नाही त्यांनी महाराष्ट्राच्या एकजुटीचं विराट दर्शन या मोर्चातून घडवावं असं, आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. (Latest Marathi News)
राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणार - अजित पवार
विराट मोर्चामध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊच. सोबतच समजावादी पक्ष, शेकाप, आमचे घटक पक्षांशी चर्चा केली, ते ही सहभागी होणार आहेत. 8 तारखेला पुन्हा सगळ्यांबरोबर बैठक होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना बाजूला केले पाहिजे. पण दरम्यान राज्यपालांना हटवले तरी मोर्चा निघणार, असं अजित पवार यांनी म्हटलं.
प्रश्न फक्त राज्यपालांच्या शिवरायांबद्दलच्या वक्तव्याचा नाही. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून सीमाभागातील गावांकडून दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी केली जात आहे, हे या आधी कधीही घडलं नव्हतं असं अजित पवार म्हणाले. राज्यातील मोठमोठे उद्योग हे गुजरातला जात आहेत.
कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. बेळगावात जाण्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखल्यानंतर राज्यातील मंत्र्यांनी माघार घेतली, सध्याची ही स्थिती संपूर्ण महाराष्ट्र हे बघतोय असं अजित पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.