MVA Seat Sharing : महाराष्ट्रात मोठा भाऊ काँग्रेस, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा मिळाल्या?

maha vikas aghadi seat sharing fourmula : महाराष्ट्रात मोठा भाऊ काँग्रेस असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला अधिक मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात मोठा भाऊ काँग्रेस, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा मिळाल्या?
mahavikas aghadi SAAM TV
Published On

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीची जागावाटपावर घोडं अडलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला हाती आला आहे. या संभाव्य फॉर्म्युल्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विधानसभेसाठी माहविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. महाविकास आघाडीच्या संभाव्य जागावाटपानुसार, काँग्रेस पक्ष १०५ जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ९५ जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट ८५ जागा लढणार असल्याची माहिती हाती आली आहे. तर अद्याप महाविकास आघाडीमध्ये विदर्भाच्या जागांचा तिढा सुटललेला नसल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस विदर्भात ४० जागा लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडी आज पुन्हा एकदा बैठक घेऊन विदर्भातील जागांचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर मुंबईतील जागांवर चर्चा केली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी केव्हा जाहीर होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची स्थापना केली होती. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर काही वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादीत फाटाफूट पाहायला मिळाली. महाराष्ट्रात यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीत आता भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे प्रमुख पक्ष आहेत.

लोकसभेत महाविकास आघाडीला घवघवीत यश

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ३० जागांवर बाजी मारली होती. तर महायुतीने फक्त १७ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने १७ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १३ जागांवर बाजी मारली होती. तर ठाकरे गटाने २१ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी ठाकरे गटाने ९ जागा जिंकल्या होत्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० पैकी ८ जागांवर विजयाचा गुलाल उधळला होता. तर सांगलीत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. या अपक्ष खासदाराने पुढे काँग्रेसला समर्थन दिलं. त्यामुळे महाविकास आघाडीची संख्या ३१ झाली होती.

महायुतीतील भाजपने २८ मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यापैकी ९ जागांवर भाजपने विजय मिळवला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १५ जागांपैकी ७ जागा जिंकल्या. अजित पवार गटाने ४ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १ जागा त्यांनी जिंकली होती. परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाने एका जागा लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत भाजपने ९९ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी शेअर केली आहे. भाजपनंतर आता इतर पक्ष कधी पहिली यादी जाहीर करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com