Eknath Shinde On Mill Workers Home: ''गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही'', असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र १६२ यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या व वितरणपत्र वाटप करण्यात आल्या. यावेळी ते असं म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजचा दिवस आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असून गेली अनेक वर्षे गिरणी कामगारांना घरे मिळणार अशी फक्त चर्चा होत होती. आज प्रत्यक्षात गिरणी कामगारांना चाव्या आणि पत्र दिले जात आहेत. सन २०२० मधील गिरणी कामगार सोडतीतील उर्वरित सुमारे ३५०० यशस्वी गिरणी कामगार/वारस यांना येत्या तीन महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. (Latest Marathi News)
सदनिकेच्या चाव्या मिळत असलेल्या गिरणी कामगारांना सदनिका विक्री किंमतीचा भरणा उशिरा केल्याबद्दल लावलेला दंड माफ करून १ जुलै २०२३ पासून सदनिकेसाठीचा देखभाल- दुरुस्ती खर्च आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. कायदे हे सर्वसामान्यांसाठी असावेत, ही शासनाची भूमिका असून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासनाकडे येण्याची वेळ येऊ नये, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवित आहोत, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गिरणी कामगारांची सन २०२० मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र आत्तापर्यंत केवळ २६ यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांची पात्रता निश्चित होऊन विक्री किंमतीचा भरणा केलेला होता. सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांच्या पात्रतेविषयक कामाला गती मिळून त्यांना सदनिकेचा लवकरात लवकर ताबा मिळावा, यासाठी आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार केली.
समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे कमी कालावधीत जवळपास १६२ यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांची पात्रता निश्चित झाली. येत्या तीन महिन्यात उर्वरित सुमारे ३५०० गिरणी कामगार/ वारस यांची पात्रता पूर्ण करुन त्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.