रश्मी पुराणिक
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. याआधी ठाकरे सरकारकडून काही निर्णय अनधिकृतपणे घेण्यात आले होते. तो आता पुन्हा अधिकृत निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली
मागच्या सरकारने घाईगडबडीत, अल्पमतात असताना काही निर्णय घेतले होते. पुढे त्यावर कायदेशीर बाबी निर्माण होऊ यासाठी या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हे देखील पाहा -
याशिवाय मुंबई आणि उपनगर भागामध्ये MMRDA च्या विविध प्रकल्पांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटींसाठी शासन हमी देखील देण्यात आली आहे. जेणेकरून प्रकल्पांना निधी कमी पडणार नाही, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
“उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतलेले निर्णय”
आज मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकणारे निर्णय नाही. तर उगवत्या सूर्याच्या साक्षीने जबाबदारी स्वीकारून घेतलेलं निर्णय आहेत या निर्णयांचा जनतेला नक्कीच आनंद होईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच यासंदर्भातला ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्राकडे मान्यतेसाठी आम्ही पाठवू. त्याचा पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.