मुंबई : केंद्रात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील अत्याचारी सरकार असून या सरकारच्या अत्याचाराविरोधात काँग्रेस सातत्याने लढा देत आहे. केंद्र सरकार दररोज महागाई करून सामान्य जनतेच्या तोंडातील घास हिरावून घेत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तुंचे दर सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले असून केंद्रातील सरकार महागाई करून जनतेची लूट करत आहे. ही महागाई थांबवा अन्यथा लुटमारी करणाऱ्या अलिबाबा आणि ४० चोरांच्या भाजपा सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.
ते महागाईमुक्त भारत अभियानाची सांगता करताना बोलत होते. ३१ मार्चपासून आजपर्यंत (७ एप्रिल) राज्यभर चाललेल्या या अभियानाची सांगती नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भवन्स कॉलेज ते ऑगसट क्रांती मैदानापर्यंत महामोर्चा काढून करण्यात आली. या मोर्चात काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, AICC सचिव व सहप्रभारी संपतकुमार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, हुसेन दलवाई, चारुलता टोकस, सुभाष कानडे, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, राजेश शर्मा, मुनाफ हकीम, विश्वजित हाप्पे, गजानन देसाई, प्रवक्ते भरतसिंह, निजामुद्दीन राईन, सुरेशचंद्र राजहंस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील अलिबाबा आणि ४० चोरांच्या सरकारला आजचा हा मोर्चा एक इशारा आहे. याच ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधी यांनी अत्याचारी इंग्रज सत्तेला ‘चले जाव’ चा इशारा दिला होता, त्यानंतर देश पेटून उठला आणि शेवटी इंग्रजांना भारतातील सत्ता सोडून जावे लागले. आज याच ऑगस्ट क्रांती मैदानातून महागाईच्या विरोधात दिलेला जनतेचा आवाज दिल्लीच्या सरकारच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही. महागाई कमी करा अन्यथा ही जनता तुम्हाला धडा शिकवेल.
मोर्चाला संबोधित करताना काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सात वर्षांपासून केंद्रातील भाजपाचे सरकार महागाई करत असून आता या महागाईने परमोच्च टोक गाठले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी जीवनावश्यक वस्तू स्वस्त करु असे आश्वासन भाजपाने दिले होते पण सत्तेवर येताच त्याचे उलटे झाले. विरोधी पक्षात असताना महागाईच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणारे भाजपाचे नेते आता मात्र गायब झाले आहेत.
पेट्रोल, डिझेल महाग झाले की सर्वच प्रकारची महागाई होत असते पण त्यावर भाजपाचा एकही नेता बोलत नाही. शेतकरी वर्षभर आंदोलन करता होता पण त्यांच्याशी या लोकांना बोलण्यास वेळ मिळाला नाही, शेतकऱ्यांवर गाड्या घातल्या. केंद्र सरकारने महागाई करुन सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले असून अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, आता ही जनताच तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. या मोर्चात मोदी सरकार व महागाईविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.