सचिन जाधव
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येत आहे. पुणे शहरात शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसैनिकांकडून आज शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून अनेक शिवसैनिक (Shivsena) शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा पुण्यात येणार असून ते कात्रज येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
आज सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे पाऊस अतिवृष्टी पीक पाणी व विकास कामे याबाबत आढावा बैठक असून दुपारी १ वाजून २० मिनिटांनी फुरसुंगी येथील पाणी योजना प्रकल्पाला भेट व पाहणी करणार आहे. तसेच २ वाजून २० मिनिटांनी खंडोबा जेजुरी देवस्थान येथे भेट देणार आहे. यानंतर ते सासवड येथे २ वाजून ४५ मिनिटांनी शिवसेना पक्षाची जाहीर सभा होणार आहे.
४ वाजता शिंदे हे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या निवास्थानी जाणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थान येथे भेट घेणार आहेत. तसेच ८ वाजून ४० मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बैठक तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभागृहात आगामी गणेशोत्सव आणि नवरात्र बाबत बैठक असणार आहे.
पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावानं उद्यान कार्यक्रम रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार होते. मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच नाव ज्या गार्डनला दिलं होतं त्या गार्डनचं उद्धाटन होणार नाही. फक्त शिंदे हे या उद्यानाची पाहणी करून जातील. प्रशासकीय मान्यता नव्हती म्हणून उद्यानाचं उदघाटन रद्द झालं असून शिंदे यांचं नावही काढून टाकण्यात आलं आहे.
ठाकरे-शिंदे आमने-सामने येणार?
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर येत आहे. पण त्याच बरोबर शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील आज पुणे दौऱ्यावर येत आहे. विशेष म्हणजे सायंकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे कात्रज येथील तानाजी सावंत यांच्या निवास्थानी भेट देणार आहे तर बरोबर ६ वाजून ४५ मिनिटांनी आदित्य ठाकरे हे कात्रज येथे शिवसंवाद साधणार आहे. म्हणजेच आज पुणे शहरात दोन्ही नेत्यांकडून टोलेबाजी पाहायला मिळणार आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.