कल्याण - मागील दीड वर्षांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात हाल झाले असून आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने अनेकजण आत्महत्येपर्यंत पोहचू लागले आहेत. मागील 18 महिन्यांपासून प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय बंद असल्याने कल्याण पूर्वेतील एका प्रिंटींग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्येचे पाऊल उचलले. बंडू पांडे असे या व्यावसायिकाचे नाव आहे. प्रेस बंद असल्याने हा व्यावसायिक 18 महिन्यांपासून आर्थिक परिस्थितीशी झगडत होता. अखेर आर्थिक परिस्थितीशी झगडण्यात अपयश आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केली. सरकार आणखी किती व्यावसायिकांचे जीव घेणार, असा संतप्त सवाल मृताच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. तसेच लवकरात लवकर सरकारने व्यापाऱ्यांकरीता काहीतरी करावे अशी मागणी केली आहे. (business man committed suicide in kalyan due to financial issues and lockdown)
हे देखील पहा -
कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरात मातोश्री अर्पाटमेंटमध्ये बंडू पांडे राहत होते. बंडू पांडे यांना पत्नी आणि तीन मुली असा संसार आहे. त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले असून ती डॉक्टर आहे. बंडू पांडे यांची उल्हासनगरात प्रिंटींग प्रेस होती. कोरोना काळात प्रिंटींगचा व्यवसाय डबघाईला आल्याने बंडू पांडे यांची प्रेस बंद पडली. पांडे आर्थिक संकटात सापडले. मागील 18 महिन्यांपासून ठप्प झालेला व्यवसाय आणि दुकानाचे वाढलेले भाडे भरताना ते मेटाकुटीला आले होते. मागील 15 दिवसांपासून नैराश्येत गेलेल्या पांडे यांनी प्रेस मधील सामान विकून काढले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी 2 लाखांची प्रिंटींग मशीन अवघ्या 20 हजारात विकली आणि त्यानंतर ते पुरते हतबल झाले. याच नैराश्येतून त्यांनी आज सकाळी घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यांच्या जाण्याने त्यांची पत्नी आशा आणि तीन मुलींचा आधार कायमचा हिरवला गेला आहे.
लॉकडाऊन काळात व्यापारी मेटाकुटीला आलेत, दुकाने सुरू केली तरी निर्बंधामुळे व्यापारी त्रस्त आहेत. याच नैराश्यातून व्यापारी आता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. दरम्यान या घटनेने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत असून लॉकडाऊनमुळे आणखी किती नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागणार आहे असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.