Mumbai News : मुंबई महापालिकेने गोरेगांव - मुलुंड लिंक रोड प्रकल्पाला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा या जोडरस्त्यालगतच्या ५५ अनधिकृत बांधकामे तोडली आहेत. मुंबई महापालिकेने कारवाई करत जागेचा ताबा पूल खात्याकडे देण्यात आला आहे. (Latest Marathi News)
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा ‘गोरेगांव - मुलुंड जोडरस्ता’ अर्थात ‘गोरेगाव - मुलुंड लिंक रोड’ हा मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी, एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
सुमारे १२.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या रस्ता रेषेत (Road Line) काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे होती. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार ही ५५ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहे.
मुंबईच्या ‘एस विभाग’ कार्यक्षेत्रातील सुदर्शन हॉटेल ते तुळशेतपाडा या सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या भागातील ५५ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. या कारवाईपूर्वी सदर भागातील रस्त्याची रुंदी ही सुमारे ३० मीटर इतकी होती, तर आता कारवाईनंतर ती रुंदी ४५.७५ मीटर अर्थात रस्ता रेषेइतकी झाली आहे.
‘एस’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाईनंतर मोकळ्या केलेल्या सदर भागाचा ताबा मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याकडे देण्यात आला आहे, अशी माहिती ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.
आंबी या कारवाईबाबत सांगताना पुढे म्हणाले, परिमंडळ ६ चे उपआयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार व आवश्यक त्या प्रक्रियेअंती करण्यात आलेल्या धडक कारवाई केली. या कारवाईत २ जेसीबींसह आवश्यक ती यंत्रसामुग्री प्रभावीपणे वापरण्यात आली'.
या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाचे कार्यकारी अभियंता भास्कर कसगीकर, दुय्यम अभियंता (रस्ते) सचिन डाऊर, सहाय्यक अभियंता (परिरक्षण) राहुल जाधव, दुय्यम अभियंता (रस्ते) श्रीमती कल्पना कोतवाल यांच्यासह २५ कामगार - कर्मचारी - अधिकारी यांचा समावेश असलेली २५ व्यक्तिंची चमू अव्याहतपणे कार्यरत होती, असे ते म्हणाले.
'कारवाईनंतर मोकळ्या करण्यात आलेल्या भागात उड्डाणपुलांचे बांधकाम प्रस्तावित असल्याने सदर भागाचा ताबा मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याकडे सोपविण्यात आला आहे. ‘एस’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या अंमलबजावणीस मदत होणार आहे, असेही आंबी पुढे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.