पिंपरी चिंचवड : आगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिका काबिज करण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. अशातच महापालिका निवडणुकीमध्ये भाजप-मनसे युती होणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सूचक विधान केलं आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी बावनकुळे यांना विचारला. यावर उत्तर देताना, राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासंदर्भात आतापर्यंत कुठलीही ठोस चर्चा झाली नाही, जसजसे दिवस पुढे जातील तसतशी चर्चा होईल असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
'उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त एक गट'
राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना 'उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही फक्त एक गट असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे'. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. पक्ष संघटना मजबूत करणे याचा अर्थ एकनाथ शिंदेचे यांच्या उमेदवाराला विरोध करणे असा होत नाही. एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असेल तर त्याला संपूर्ण ताकद आणि पाठबळ देण्याचे काम भाजप करेल. असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युती होणार?
मुंबई महानगर पालिकेत 150 नगरसेवक निवडून आणण्याचा दावा अमित शाहांनी केला आहे. खरंतर गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनेचाच झेंडा आहे. त्यात शिवसेनेची ताकद देखील मुंबईत मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपसमोर हे आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फोडण्यासाठी भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. त्यामुळे भाजप-मनसे युती होणार अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.