सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई
Navi Mumbai: राज्यामध्ये सध्या कडक उन्हाळा (Summer) सुरु आहे. गरमीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये ऊन्हामुळे होत असलेल्या त्रास कमी करण्यासाठी अनेक जण शीतपेय पितात. पण हेच शीतपेय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कारण सध्या एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे जो पाहून तुम्ही देखील शीतपेय पिणं बंद कराल. नवी मुंबईच्या (Navi Mumbai) एपीएमसी मार्केटमधला (APMC Market) हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.
उन्हाने त्रस्त होऊन फळांचा ज्यूस पिण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर सावधान. कारण ताज्या फळांचा ज्यूस पिण्याऐवजी तुम्ही सडक्या फळांचा ज्यूस तर पीत नाही ना याची खात्री करु घ्या. कारण साम टीव्हीच्या हाती एपीएमसी फळ बाजारातील एक धक्कादायक विडिओ समोर आलाय. या विडिओमध्ये एक परप्रांतीय एपीएमसीमध्ये व्यापाऱ्यांनी फेकून दिलेली सडकी सफरचंद उचलताना कैद झाला आहे. हे सफरचंद ज्यूस तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली या फळे वेचणाऱ्यानेच दिली आहे.
एपीएमसीच्या आवारत खरं तर हे सफरचंद खराब झाल्यामुळे फेकून दिले आहेत. हे सफरचंद खाण्या लायक सुद्धा नाहीत तरी देखील ते गोळा केले जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही व्यक्ती सफरचंद गोळा करण्यामध्ये व्यग्र आहे. अशामध्ये कॅमेरा पाहताच तो जरा घाबरतो. हे सफरचंद कशासाठी घेऊन जात आहे असा सवाल केला असता घरी ज्यूस तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची सारवासारव तो करताना दिसतोय.
हेच सडलेले सफरचंद घरी नेऊन त्याचा ज्यूस तयार केला जातो आणि तो विकला जातो. गरम होत असल्यामुळे थोडासा थंडावा मिळावा यासाठी अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहिलेल्या परप्रांतीयांकडून हे ज्यूस विकत घेऊन पितात. पण खरं पाहायला गेलं तर हे असे ज्यूस पिणे आपल्या शरीरासाठी खूपच घातक आहे. दोन पैशांसाठी हा अशाप्रकारे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे चित्र वारंवार समोर येत असते. यापूर्वी रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबत, पाणी पुरीवाल्याचा धक्कादायक व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.
दरम्यान, यावर मनसे पदाधिकाऱ्याने आक्रमक भूमिका घेत नागरिकांनी फळांचा रस पिताना फळे ताजी असल्याची शहानिशा करावी असे आवाहन केलेय. एपीएमसीबाहेर तसेच एपीएमसीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सानपाडा रेल्वे स्थानकाजवळ अनेक ज्यूसवाले असून यातील काही ठिकाणी ज्यूस तयार करण्यासाठी सडक्या फळांचा वापर होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. अन्न व औषध प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी करावी अन्यथा मनसे आक्रमक भूमिका घेईल, अशी प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.