Amol Kolhe: एवढं जे महाभारत घडलं त्यात नेमकं 'कोण' जिंकलं? अमोल कोल्हेंची पोस्ट चर्चेत

'खुर्ची तीच पाय तेच फक्त वरचं बूड बदललं, हुजरे तेच मुजरे तेच फक्त समोरचं धूड बदललं.'
Amol Kolhe's Tweet on Maharashtra Political Crisis
Amol Kolhe's Tweet on Maharashtra Political CrisisSaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

मुबंई : जवळपास मागील दीड आठवड्यांपेक्षा जास्त वेळ चाचलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एक ट्विट केलं आहे. एवढं जे महाभारत घडलं त्यात नेमकं“कोण” जिंकलं? असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे. शिवाय या ट्विटला त्यांनी कवितेच्या ओळीं जोडल्या आहेत.(Amol Kolhe Latest Marathi News)

त्या कवितेच्या ओळी खालीलप्रमाणे -

खुर्ची तीच पाय तेच फक्त वरचं बूड बदललं, हुजरे तेच मुजरे तेच फक्त समोरचं धूड बदललं. फायली त्याच प्रस्ताव तेच फक्त सहीचं पेन बदललं, बोट तेच शाई तीच फक्त दाबलेलं बटन बदललं. माणसं तीच, भाषा तीच फक्त आतलं मन बदललं. आरोप तेच प्रकरणं तीच फक्त वातावरण बदललं पराभूतानं मन जिंकलं विजेत्यानं सत्व गमावलं. मतदारांनी लोकशाहीला अन् लोकशाहीनं न्यायपालिकेला पुसलं एवढं जे महाभारत घडलं त्यात नेमकं "कोण" जिंकलं?? अशा ओळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये (Tweet) जोडल्या आहेत.

काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जवळपास ९ दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष संपुष्टात आला. मात्र, या सत्तासंघर्षादरम्यान राज्यात अनेक घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांनी आपल्या बंडखोरांना परत या, असं वारंवार आवाहन केलं, तर तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपसोबत युती करा, तरच आम्ही मागे येतो असं बंडखोरांनी सांगितलं.

आपल्या कुटुंबावर आणि सहकाऱ्यांवर सतत आरोप करणाऱ्या भाजपसोबत जायला तयार नसल्याचं उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे बंडखोरांनी आपलं बंड मागे घेतलं नाही आणि अखेर ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन पायउतार व्हावं लागलं.

याच राज्यातील सत्तानाट्यावरती भाष्य करणारं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं. या ट्विटद्वारे त्यांनी मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या सोशल मीडियावरती सतत अॅक्टीव्ह असतात. राज्यातील घडामोंडीवरती ते व्यक्त देखील होत असतात. त्यामुळे त्यांनी आज देखील कोणत्याही पक्षाची बाजू न घेता समर्पक असं ट्विट केल्याने नेटकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केलं जात आहे.

कोल्हे यांनी सत्तेबाबत ट्विट केलं आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्याबाहेरुन राज्यातील राजकारणाची सुत्र हलविणारे एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळापुर्वीच ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवास्थानी पोहचले असून फडणवीस यांच्या बंगल्यावरुन ते राजभवनावरती जाणार आहेत. शिवाय हे फडणवीस आणि शिंदे आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com