Abdul Sattar Controversial Statement : शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता, सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी घातल्याचं दिसून आलं. सत्तारांच्या (Abdul Sattar) या कृत्याने मोठा वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी तातडीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची माफी मागावी. तसेच मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहे. पुण्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईमध्ये तर सत्तार यांच्या बंगल्याच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली असल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. अब्दुल सत्तार राजीनामा देत नाही, तोपर्यंत इथून जाणार नाही असं म्हणत विद्या चव्हाण यांनी मुंबईत सत्तार यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
सत्तार यांच्याविरोधात मुंबईपाठोपाठ ठाण्यातही राष्ट्रवादीने आंदोलन करत आहे. ठिकठिकाणी सत्तार याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी सत्तार यांच्या पुतळ्याला काळे देखील फासले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी सत्तार यांच्या फोटोंना जोडे मारले आहे.
रुपाली ठोंबरे आक्रमक
अब्दुल सत्तार हे आमच्या सुप्रियाताईंना ज्या भाषेत बोलले. तुमचे विचार किती घाणेरडे आहेत, आपली मंत्री होण्याच्या पात्रतेचे आहात का? आपली तेवढी लायकी आहे का? आपण जे काही बोलता जाणून बुजून हे महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार यापुढे तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्ही माफी देखील मागितली तरी तुमची आम्ही गय करणार नाही. तु्म्ही मंत्री होण्याच्या पात्रतेचे नाही. राजीनामा दिला पाहिजे, असा शब्दात रुपाली ठोंबरे यांनी सत्तार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.