मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेले काही दिवस सातत्याने स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. भाजप आधीच शिवसेनेपासून वेगळा झाला आहे. पटोले यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधून पटोले यांना टोला लगावला आहे. स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल, असे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे.
''महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. एका बाजूला राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्याने जोर धरला आहे. कोल्हापुरात सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. धनगरांना वेळीच आरक्षण मिळाले नाही तर पंढरपुरातील विठोबा माऊलीची महापूजा रोखण्याची भाषा सुरू झाली आहे. ‘ओबीसी’चे पुढारीही रस्त्यांवर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात कोरोनाचा धुमाकूळ पूर्णतः थांबलेला नाही. या परिस्थितीतही काही लोकांना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागले आहेत,'' असा चिमटा सामनाच्या अग्रलेखातून काढण्यात आला आहे. कोणतेही अजीर्ण वाईटच असेही शिवसेनेने सुनावले आहे.
हे देखिल पहा
महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ‘ग्रस्त’ असतील असे कधीच वाटले नव्हते, असे सांगत शिवसेना म्हणत, ''महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे,''
अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या विधानावर भाष्य केले आहे. ज्याच्याकडे १४५ आमदारांचे बहुमतआहे त्याचे सरकार बनेल व त्यांचा मुख्यमंत्री होईल, हे अजित पवार म्हणाले तेही खरेच आहे. संसदीय लोकशाही हा बहुमताच्या आकड्यांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला जमेल तो गादीवर बसेल. २०२४ चे मैदान अद्याप लांब आहे, पण प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा अचानक करू लागले आहेत. सगळेच स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी व शिवसेना या दोन पक्षांना एकत्र लढावे लागेल. याचे सुतोवाच शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी केलेच आहे, '' असे सांगत शिवसेनेने नाना पटोलेंना अप्रत्यक्ष टोला दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.