अहमदनगर : मागील काही काळापासून महाराष्ट्राबरोबरच देशामध्ये कोरोनाने चांगलेच थैमान (Corona) घातले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसे गमावली आहेत. यामुळे देशामध्ये अनेक महिला विधवा झाले आहेत. अशा विधवा महिलांना आर्थिक आधार देण्याकरिता सरकारकडून थोड्या प्रमाणात मदत केली जात आहे.
नगरमधील एका तरुणाने मात्र समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत एका विधवा महिलेशी विवाह (Marriage) केला आहे. त्याने संबंधित महिलेला आणि तिच्या ९ महिन्याच्या बाळाला आयुष्यभराचा आधार दिला आहे. या अनोख्या लग्नाने संबंधित तरुणाचे सर्व स्तरामधून कौतुक केले जात आहे. तसेच काही स्वयंसेवी संस्थांनी सरसावत दाम्पत्याला भरीव मदत करण्यात आली आहे.
हे देखील पहा-
किशोर राजेंद्र ढुस असे संबंधित तरुणाचे नाव आहे. तो अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या गावातील येथील रहिवासी आहे. या भागातील रहिवासी असणाऱ्या महिलेच्या पतीचे काही दिवसाअगोदर कोरोनामुळे निधन झाले होते. पदरी ९ महिन्याचे बाळ असणाऱ्या महिलेच्या पतीने अशी अचानक साथ सोडल्यामुळे संबंधित महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण देवळाली प्रवरा येथील किशोर याने संबंधित महिलेशी लग्न करून बाळासह तिचा स्वीकार करण्याची तयारी दर्शवली.
त्यामुळे दोन्ही बाजूंनी संमती मिळाल्यावर हा अनोखा विवाह पार पडला आहे. यावेळी राहुरीचे तहसिलदार फसियोद्दीन शेख, राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्था आणि देवळाली प्रवरा हेल्थ टीम यांनी संबंधित लग्नाकरिता पुढाकार घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी या दाम्पत्याचा सत्कार केला आहे. त्यांना कपडे आणि वस्तू भेट देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्थेतर्फे बाळाच्या नावावर ११ हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. यावेळी याची पावती देखील या दाम्पत्यांना देण्यात आली आहे. राहुरी याठिकाणी हा अनोखा विवाह पार पडल्याने संबंधित तरुणाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.