Maratha Reservation
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदालन सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे राज्यभर खळबळ माजली आहे. सुनील बाबुराव कावळे ( वय 45, चिकनगाव, ता. अंबड, जि. जालना ) असं या तरुणाचं नावं आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील अंबड तालुक्यातील या तरुणाने स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेला तरुण जालन्याहून एकटाच मुबंईत आला होता. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास राहिल्यामुळे स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर ओबीसीमधून आरक्षण देता येईल, असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. यावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील राज्यभर ठिकठिकाणी सभा घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्न करत आहेत. त्यातच आता आरक्षणासाठी मराठा तरुणाने आत्महत्या केल्यामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांचा दोन दिवस पुणे दौरा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत त्यांची सभा होणार आहे. राज्य सरकारला जरांगे यांनी दिलेली मुदत २४ ऑक्टोबरला संपत असताना हा त्यांचा दौरा सरकारच्या अडचणी वाढवणारा ठरणार आहे. भाजपसोबत गेलेले अजित पवार, रामराजे निंबाळकर, मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे सभा घेणार आहेत. त्यातच मराठा तरुणांच्या आत्महत्या हा सरकारसाठी चिंतेचा विषय रहाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.