
How Pradeep Kurulkar caught in honeytrap of Pakistani spies: हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांची गुप्तचर यंत्रणेकडून (RAW) चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांनी पाकिस्तानी हेरांना कोणती माहिती आणि कशा प्रकारे पुरवली याची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून लॅपटॉपसह तीन मोबाईल आणि हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यातून त्यांनी देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे ‘डीआरडीओ’च्या अहवालातून समोर आले आहे.
२०२२ पासून पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात
प्रदीप कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यावेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते.
कोण आहेत प्रदीप कुरुलकर?
शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे संरक्षण क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) संशोधन आणि विकास आस्थापनेच्या प्रतिष्ठित प्रणाली अभियांत्रिकी प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रदीप कुरुलकर यांची क्षेपणास्त्र क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून गणना होते.
क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाइल मानवरहित प्रणालीची रचना आणि विकास यामध्ये कुरुलकर यांचे कौशल्य आहे. कुरुलकर यांनी एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून अनेक लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणे डिझाइन, विकास आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रतीप कुरुलकर यांचे कौशल्य काय आहे?
प्रदीप कुरुलकर यांचा जन्म 1963 मध्ये झाला. त्यांनी 1988 मध्ये तामिळनाडूतील सीव्हीआरडीई आवाडी येथे डीआरडीओसाठी काम करण्यास सुरुवात केली.1985 मध्ये सीओईपी पुणे येथून प्रथम श्रेणीत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये (बीई) पदवी प्राप्त केली. त्यांनी ड्राइव्ह आणि ऍप्लिकेशन्सवर लक्ष केंद्रित करून IIT कानपूर येथे प्रगत पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पूर्ण केला. क्षेपणास्त्र प्रक्षेपकांची रचना आणि विकास, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाइल मानवरहित प्रणाली यात त्यांचा हातखंड आहे.
प्रदीम कुरुलकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान?
एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून कुरुलकर यांनी हायपरबेरिक चेंबर, मोबाईल पॉवर सप्लाय, हाय-प्रेशर न्यूमॅटिक सिस्टीम, क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रोग्राम एडी, एमआरएसएएम, निर्भय सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली, प्रहार, क्यूआरएसएएम आणि एक्सआरएसएएम यांसारख्या लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणांची रचना, विकास आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कुरुलकर यांना ९ मेपर्यंत कोठडी
चौकशीत कुरुलकर (Pradeep Kurulkar) दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाईल राज्य दहशतवाद विरोधी पथकातील अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता. याबाबत डीआरडीओच्या दिल्ली मुख्यालयातील कर्नल प्रदीप राणा यांनी मुंबईतील एटीएसच्या काळा चौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलमान्वये दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या न्यायालयाने त्याना ९ मेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली.
हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या?
कुरुलकर यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हनी ट्रॅपमध्ये अडवल्यानंतर त्यांनी परदेशात पाकिस्तानी हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकर यांनी कार्यालयीन गोपनीय माहिती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) गुप्तचर यंत्रणेला दिल्याचे तपासात आढळून आले आहे.
आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानला दिली गोपनीय माहिती?
कुरुलकर यांनी शासकीय गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानला दिल्याचाही संशय आहे. कुरुलकर देशातील अन्य राज्यांतील काही जणांच्या संपर्कात असल्याची मिळाली आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांशी संपर्क साधताना कोणत्या उपकरणांचा वापर करत होते, या दृष्टीने एटीएसकडून तपास करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.