मयुर राणे, मुंबई
Sanjay Raut On Amit Thackeray: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून थेट अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. अमित ठाकरेंना मनसेने माहिमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटानेही अमित ठाकरेंविरोधात आपला उमेदवार जाहीर केला आहे. अशातच आता ठाकरे गटाकडूनही अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचेही नाव असून त्यांना दादर- माहिम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या यादीनंतर काही तासातच शिवसेना शिंदे गटाकडूनही उमेदवार यादी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये सदा सरवणकर यांना अमित ठाकरेंविरोधात तिकीट मिळाले. अशातच आता शिवसेना ठाकरे गटही याठिकाणी उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नसल्याचे सांगण्यात येत होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभेच्या मैदानात उतरल्यानंतर त्यांच्याविरोधात वरळीमधून उमेदवारी न देण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेही अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता संजय राऊत यांनी माहिममध्ये शिवसेना ठाकरे गट उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिला आहे. त्यांचा एक राजकीय पक्ष आहे. समाजवादी पार्टी , वंचितही उमेदवार देतात. भारतीय जनता पत्राला मदत करण्यासाठी ज्या शक्ती तयार झाल्या आहेत, त्या प्रत्येक जण जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न करतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष निवडणूक जिंकत नाहीत तरी काही पक्ष निवडणूक लढत आहेत. आमच्याच परिवारातले अमित ठाकरे जर निवडणूक लढवत असतील तर त्यांचे स्वागत आहे. दादरमध्ये शिवसेना कायम लढत आली आहे. दादर- माहिम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली, जिथे स्थापना झाली तिथे शिवसेना लढणार नाही, असं होणार नाही, असे संजय राऊत म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.