सातारा: गेले काही दिवस नगरपालिका या विषयावरून सातारच्या दोन्ही राजांमध्ये जोरदार पत्रकबाजी सुरू आहे. काल खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) आमदार शिवेंद्रराजेंना (Shivendra Raje Bhosale) समोरा-समोर येण्याचे आव्हान केले होते, त्या आव्हानाला उत्तर देताना आज शिवेंद्रराजेंनी पत्रक काढले आहे. त्यात ते म्हणतात, गेले पाच-सहा वर्षात नगरपालिकेला अक्षरशः धुवून खाल्लं. टक्केवारी, कमिशन, टेंडर आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी सत्तारूढ आघाडीत एकमेकांचे गळे धरणे आणि मारामाऱ्या करणे, ही अनोखी परंपरा सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे "कोण चोर आणि कोण लुटारू हे सातारकरांनी चांगलंच ओळखलंय" असा खोचक टोला आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंना लगावला आहे. (Satara Politics News)
हे देखील पाहा -
शिवेंद्रराजेंच्या परिपत्रकात पुढे म्हटलं की, एक ना धड भराभर चिंद्या असा कारभार पालिकेत पाहायला मिळाला. तुम्ही शहराच्या विकासासाठी वेगळं केलंय तरी काय? असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ज्या सर्वसामान्य महिलेला सातारकरांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले त्या माधवी ताईंना तुम्ही कामच करून दिले नाही, याचा खुलासा करण्याची हिम्मत उदयनराजेंनी दाखवावी, असा टोलाही त्यांनी उदयनराजेंना लगावला आहे.
नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे हे तर नगरपालिकेचे कामच आहे. पण, तुम्ही ज्या विकासकामांची जंत्री जाहीर केली त्यातील एकतरी काम सातारकरांच्या उपयोगाचे आहे का? भुयारी गटर योजनेची वर्क ऑर्डर २०१८ ला निघाली. आजही या योजनेचे काम पूर्ण नाही, किंबहुना हे काम कधी पूर्ण होणार हे कोणालाच माहिती नाही. या योजनेमुळे शहरातील चांगल्या रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली. घनकचरा प्रकल्पाची तर तऱ्हाच न्यारी आहे. कचरा डेपोतील कचऱ्याचे ढीग रिकामे होणे अपेक्षित असताना कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. ही योजना सपशेल फेल गेली असून केवळ ठेकेदाराला पोसण्याचा उद्योग सुरु आहे. ग्रेड सेप्रेटर म्हणजे तर असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे असं आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. (Shivendra Raje Bhosale Latest News)
आपल्या परिपत्राक ते पुढे म्हणाले की, राजवाड्याकडून कलेक्टर ऑफिसकडे जायला मार्ग असणे आवश्यक होते मात्र, ग्रेडसेपरेटर म्हणजे नेमकं काय करून ठेवलंय हे एक कोडंच सातारकरांना पडलं आहे. यातही केवळ पैसे वाया घालवण्याचा प्रकार झाला आहे. शासनाच्या अमृत योजनेचा लाभ सर्वच नगरपालिकांना मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही वेगळं काय केलंय हा खरा प्रश्न आहे. डंपर, डंपर करताय तो डंपर गेले तीन वर्षांपासून बंदच आहे, हे सातारकरांनाही माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामात तर मोठी गोलमाल आहे. (Udayanraje Bhosale Latest News)
ग्रेड सेपरेटर ऐवजी उड्डाण पुलाचा प्रस्ताव होता पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी उड्डाण पूल रद्द करून ग्रेड सेपरेटर मंजूर केला. त्यातले ८० लाख रुपये शिल्लक राहिले म्हणून त्यातून तुम्ही शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम सुरु केले. मात्र हे पैसेही संपले आणि काम अपूर्ण राहिले. वास्तविक या कामाचे कोणतेही नियोजन केले नाही. शिवतीर्थ म्हणजे सातारकरांची अस्मिता आणि शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय. शिवतीर्थ म्हणजे प्रेरणास्थान. मग या कामासाठी लागणाऱ्या निधीची पालिकेने आधीच तरतूद करणे आवश्यक होते. मात्र तुमच्या नाकर्तेपणामुळे आणि आडमुठ्या धोरणामुळे निधी अभावी हे कामही अर्धवट राहिले. स्वच्छता अभियानात पाचगणी, कराड शहरांनी बाजी मारली पण, जिल्ह्यातील मोठी पालिका असलेला सातारा शेवटी, हे भूषणावह आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
केवळ शोबाजी करायची आणि बोलबच्चनगिरी करुन मीच कैवारी असा कांगावा आणि दिखावा करायचा हे सातारकरांना नवीन नाही. तेच- तेच डायलॉग मारणे आता बंद करा. समोरासमोर या म्हणजे नेमकं काय? जिल्हा बँक निवडणुकीत तुम्ही संचालक म्हणून बिनविरोध झाल्यावर सुरुची बंगल्यावर आला. माझी भेट घेऊन मला मिठाईचा बॉक्स दिला, आणि आभार मानले. त्यावेळी मी समोरच होतो ना. आणखी कसले समोरासमोर पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या कुकर्मावर पडदा टाकण्यासाठी वापरत असलेले तेच-ते डायलॉग आता बदला, सातारकरांना आता त्याचाही कंटाळा आला आहे. तुम्ही किती आणि कसला विकास केला हे सुज्ञ सातारकरांनी पहिले आहे आणि त्यामुळेच सातारकर तुम्हाला 'नारळ' दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असा टोलाही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंना लगावला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.