बीड - पैशाचा मोह कधी कुणाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार बीडच्या (Beed) परळीत (Parali) समोर आला आहे. पैशाचा पाऊस पाडून गुंतवलेली रक्कम पाच पट करून देण्याचे आमिष, एका महाठग बापलेकानी व्यापाऱ्यास दाखवले. या दाखवलेल्या आमिषा भुलून व्यापाऱ्याने चक्क पाच लाखांची रक्कम त्या महाठगांना दिली. मात्र त्यानंतर पैशाचा पाऊसचं पडला नाही आणि दिलेली रक्कमही परत मिळाली नाही. अंगद अंकुशराव थोरात असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. (Beed Latest News)
अंगद थोरात यांचे परळीत किराणा दुकान आहे. तर थोरात यांनी पोलिसात (Police) दिलेल्या तक्रारीवरून, थर्मलचे काम घेणारा गुत्तेदार प्रेमसागर उर्फ बाळासाहेब बापूराव जोगदंड यांचा मुलगा प्रशांत याच्यासोबत, अंगदची एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. व्यापार वाढविण्यासाठी माझे वडील भविष्यात मदत करतील असे प्रशांतने अंगदला सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर एके दिवशी प्रशांतने अंगदला करोडपती करण्याचे आमिष दाखवले. माझ्या ओळखीचे एक महाराज आहेत , ते आपल्या घरी येऊन विधी करतात, त्यांची सेवा केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यास पैशाचा पाऊस पडतो अशी बतावणी प्रशांतने केली.
हे देखील पहा -
एवढंच नाही तर अंगदला विश्वास बसावा म्हणून मोबाईलवर पैशाचा पाऊस पडतानाचा व्हिडीओ देखील दाखवला. तुझ्या जवळील पैशाच्या पाच पट पैसे करून दाखवतील असे आमिष त्याने दाखवले. याला प्रशांतचे वडील प्रेमसागर यानेही खरं असल्याच सांगितलं. या बापलेकाच्या भूलथापांना बळी पडून, मागील वर्षी दसऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी अंगदने पाच लाख रुपये त्या बापलेकाकडे सुपूर्द केले. हे पैसे आम्ही महाराजांना पोहोच करतो, आठ दिवसात ते तुझ्या घरी येऊन पूजा करतील आणि पैशाचा पाऊस पाडून याच्या पाच पट पैसे तुला करून देतील असे त्यांनी सांगितले.
मात्र महाराज आलेच नाहीत. महाराजांना बोलवण्याबाबत अंगदनी अनेकदा जोगदंडकडे विचारणा केली , परंतु प्रत्येक वेळी ते वेगवेगळी करणे सांगत टाळत राहिला. अखेर शंका आल्याने अंगदने त्यांना महाराजाचा पत्ता आणि रक्कम दिल्याचे बँक खाते विचारले, असता त्यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने, रक्कम परत करण्याची मागणी करूनही जोगदंड बापलेकांनी त्यांचे पैसे परत केले नाहीत. अशी तक्रार अंगद थोरात यांनी फिर्यादीतून केली आहे.
दरम्यान याप्रकरणी थोरात यांच्या फिर्यादीवरून प्रेमसागर जोगदंड आणि प्रशांत जोगदंड या दोघांवर संभाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.